११:४५ वाजले होते. चांदनी चौकाच्या सीसीडीमध्ये आता शुकशुकाट होता. स्टाफ आता क्लोझिंगच्या तयारीत होते. काऊंटरवरील स्टाफ दिवसभरच्या बिलांची जमवाजमव करत होता. त्याच्यासमोरच रिया आणि अनिकेत बसले होते. रिया ब्लॅक कोटमधून मोबाइल काढून बघते आणि मनात विचार करते अजय आणि दिनेशला अजून किती वेळ लागेल.
“काय झालं रिया”, अनिकेत डाव्या हातात कॉफी घेत म्हणतो.
“काही नाही”, रिया मोबाइल परत कोटमध्ये ठेवते.
“उशीर होतोय का ? निघूयात ?”
“नाही रे, थांबूयात आणखी दहा-पंधरा मिनिटे”, रिया कॉफीचा एक प्याला घेत बोलते.
“मग रिया घरी कधी जाणार आहेस, एक्झॅम संपून तर दोन दिवस झालेत”
“उद्या जाणार आहे”
सीसीडीचा मॅनेजर हातातील घड्याळाकडे बघत अनिकेतला पाहतो. अनिकेतलाही अंदाज आला की सीसीडी बंद होण्याची वेळ झाली आहे.
“वातावरण काय मस्त आहे ना, डिसेंबरची थंडी आणि हातात गरम कॉफी” रिया दोन्ही हातांनी कप घेते.
“हो”
अनिकेत उजवा खांदा खुर्चीवर टेकवत काचेतून बाहेरील शांत रोड आणि नेहमीपेक्षा थोडा जास्त असलेल्या अंधाराकडे पाहतो.
“आज थोडा जास्तच अंधार दिसतोय”, अनिकेत अजूनही बाहेर पाहत असतो.
“असू दे बाहेर, आत तरी लाइट आहे ना”, रिया परत एक वेळेस मोबाईल पाहते.
“सर, पाच मिनिटात सीसीडी बंद होणार आहे”, मॅनेजर दोन्ही हात जोडून असा उभा राहतो की डाव्या हातावरील घड्याळात किती वाजले असतील हे दोघांना दिसेल.
“पण एवढी घाई का आहे, आणखी दहा-पंधरा मिनिटे थांबू शकत नाही का ?” रिया थोड्या नाराज स्वरात बोलते.
“नाही मॅडम, १२ वाजता बंद हा कंपनीची ऑफिशियल वेळ आहे.”
“काही हरकत नाही, आम्ही निघतो २ मिनिटात”. अनिकेत शेवटचा प्याला संपवत म्हणतो.
“सॉरी सर”, मॅनेजर म्हणतो आणि स्टाफला बंद करण्यासाठी सिग्नल देतो.
रिया आणि अनिकेतची कॉफी संपली होती. तेवढ्यात अजय आणि दिनेश जोरात दार उघडत आत येतात.
“अरे तुम्ही दोघे इथे कस काय”, अनिकेत उठून मोबाइल आणि वालेट आत ठेवत म्हणतो.
अनिकेत एकदा रियाकडे आणि अजयकडील असलेला बॉक्स बघतो.
“सरप्राइज”, रिया मोठी स्माईल देत म्हणते.
“हॅप्पी बर्थडे”, तिघेही एकाच स्वरात अनिकेतला शुभेछा देतात.
“थॅंकस गाईज”, अनिकेत डाव्या हातांनी रियासोबत हँड शेक करतो आणि अजय आणि दिनेशला मिठी मारतो.
“चला केक कापुया”, अजय केकचा बॉक्स टेबलावर ठेवत म्हणतो. एक-एक लाइट बंद व्हायला लागते.
“हे काय चाललय”, दिनेश स्वत भोवती एक फेरी घेत बंद होणार्या लाईटकडे पाहत म्हणतो.
“सीसीडी आता बंद होणार आहे”, अनिकेत पुढे होत म्हणतो.
“आता कुठे केक कापणार”, दिनेश बाईकची चावी केक बॉक्सवर टाकतो.
रिया हातात चावी घेत म्हणते, “तुझ्या बाईकवर”
चौघेही बाहेर निघतात. रिया, अजय आणि दिनेश रोडवरील बाईकडे जातात.
अनिकेत सीसीडीचा मेन दार बंद करणार्या स्टाफला विचारतो.
“आज इतका अंधार झाला आहे, रस्त्यावरील लाईट बंद आहे का ?”
स्टाफवाला शेवटचा लॉक लावतो.
“रस्त्यावर खांबच नाही सर, काल एक डंपर चालकाने उतारावरून येताना सरळ खांबाला धडक दिली”, स्टाफवाला चावी खिशात ठेवत म्हणतो, “गुड नाईट सर”.
“गुड नाईट”
“दिनेश गाडी स्टँडवर लाव”, रिया बाईकवरील निसटत असलेला केक घेते.
दिनेश सिंगल स्टँड काढून डबल स्टँडवर पाय ठेवतो
“अजय गाडी मागे ओढ”.
हायवे वरुण एका एसयूव्ही मध्ये दोन मित्र पुण्यात येत असतात. सुधीर गाडी चालवत असतो आणि मधेच त्याला डुलकी याला लागते.
“लक्ष कुठे आहे तुझ, झोप येत आहे का” ? राकेश त्याचा खांदा हलवतो.
“नाही रे”, जोरात मान हलवतो आणि दोन्ही भुवया उंचावत म्हणतो.
“आणि आली तरी तू काय करणार आहेस, तुला थोडीच चालवता येते”, दोघही हसतात.
“गाडी थोडी बाजूला थांबवतोस का, मला १ नंबरला जायचं आहे”, राकेश म्हणतो.
“इथे नको चाँदनी चौकात थांबवतो”.
“मी नाही थांबू शकत”.
“पाच मिनिटात येईल”.
“अनिकेत ये लवकर”, रिया उजवा हात हवेत फिरवत म्हणते.
“ही काय गाडी खांबाजवळ लावलीत”, अनिकेत पडलेल्या खांबाकडे पाहतो.
मग काय झालं, तुला काय वाढदिवसाला खांब पाहिजे” अजय आणि दिनेश एकमेकांना टाळी देतात. अनिकेतही दिनेशच्या टीशर्ट वरील योयो लोगोकडे पाहत म्हणतो, “योयो मॅन”. चौघही हसायला लागतात.
“चल अनिकेत केक काप”, रिया केक बॉक्स उघडून केक बाईकवर ठेवते.
“उतर खाली आणि लवकर ये”. सुधीर म्हणतो
“इथे कुठे थांबवलस, कुठे जागाच दिसत नाही”, राकेश काच खाली घेत बाहेर पाहतो.
“हे काय इथे कर उताराला, झाडीपण दिसते”, सुधीर उजवीकडे हात करून दाखवतो.
केकवर गोलाकार हॅप्पी बर्थडे आणि त्याच्या आत अनिकेत – २० लिहल होत. तिन्ही पांढरे शब्द चॉकलेटी केकवर उठून दिसत होते. अनिकेत प्लॅस्टिकच्या चाकूने केक कापण्यासाठी हात पुढे करतो.
“थांब अनिकेत”, अजय जरकीनच्या खिशातून कॅन्डलस बाहेर काढतो.
“हे पेटव दिनेश”.
सुधीर गाडी बंद करून ब्रेकवर पाय ठेवतो. सीट थोडी मागे सरकवतो आणि दोन्ही हात डोक्यामागे घेतो. पाच दहा सेकंदात त्याचे डोळे मिटायला लागतात. हळू हळू ब्रेकवरील पायाचा दाबपण कमी व्हायला लागतो. गाडी पुढे सरकायला सुरुवात होते. राकेश पॅंटची चैन वर ओढून मागे वळून पाहतो तर गाडी १० मीटर पुढे गेलेली असते आणि जास्त वेगाने खाली जाऊ लागते. तो लगेच मोबाईलवर त्याला कॉल करू लागतो.
दिनेश सिगारेटच्या लाइटरने कॅन्डलस पेटवतो. रिया बाईकच्या समोर उभी राहून मोबाईलवर फ्लॅशलाइट चालू करून व्हिडिओ शूट करू लागते तर अजय रियाच्या डावीकडे उभा राहून फोटो काढायला लागतो. अनिकेत रस्त्यावर आडवी असलेल्या बाईकच्यामागे उभा राहून केकवरील कॅन्डलस फुकायला लागतो.
सुधीरचा डॅशबोर्डवर असलेला मोबाईल वाजायला लागतो. सुधीरला आवाजामुळे जाग येण्यास सुरुवात होते. मोबाईल वायब्रेट होऊन डॅशबोर्डवरुण जोरात त्याच्या गूडघ्यावर पडतो. तो लगबगिने जागा होतो आणि पाहतो पुढे १०० मीटर अंतरावर दिवाळीतल्या फुलबाज्यासारख काही तरी चमकत होत आणि काही मुले फ्लॅशलाईट चालू करून उभे होते. तो सीट पुढे न घेता तसाच पुढे येतो आणि उजव्या हातांनी चावी फिरवतो.
तिघेही जोरात हॅप्पी बर्थडे गाणे गायला सुरुवात करतात. अनिकेत खाली वाकून केक कापत असताना डावीकडे पाहतो. एकदम सर्वांच्या अंगावर गाडीचा तीव्र प्रकाश पडतो. अजय मोबाईल तसाच हातात धरून दोन्ही हात चेहर्यासमोर क्रॉस करून ओरडतो.
“पुढे गाडी आहे”.
“ओ नो”, रिया घाबरून हातातून मोबाईल खाली टाकते आणि दोन्ही हातांनी चेहरा झापते.
दिनेश पडलेल्या खांबावरून जोरात उडी मारून फूटपाथवर पडतो.
अनिकेत डाव्या हातातील चाकू हेडलाइटच्या प्रकाशाकडे दाखवत आणि उजवा हात चेहर्यावर ठेवत थोडासा मागे झुकतो.
सुधीर एकदम जोरात ब्रेक दाबतो. गाडीचा टायर काहीसा घासतो आणि गाडी अनिकेतपासून जेमतेम दोन-तीन इंच अंतरावर येऊन थांबते.
“आज माझा वाढदिवस नाही पुनर्जन्म झाला”, “हॅप्पी बर्थ डे टु मी” ! अनिकेत पुटपुटतो.
good read! very realistic.