मुवर्स आणि पकर्सची गाडी सोसायटीत आली होती. विनोद गाडी भोवती एक फेरी मारून विचार करतो की ह्या टेम्पोमध्ये सर्व सामान बसेल की नाही, परत दोन फेर्या तर नाही होणार ?
“एका फेरीमध्ये सर्व सामान जाईल का ?” मोबाईलवरील मेल पाहत तो ड्रायवरला विचारतो.
ड्रायवर उजव्या खिशातून घडी पडलेला कार्बन कॉपीचा कागद पूर्ण उकलून पाहतो.
“हो सर, हे काय तुमच्या घरच्या सामानाच इस्टिमेशन केलेलं आहे, एका फेरीमध्ये सर्व जाईल.”
ड्रायवरच्या वरच्या खिशातील मोबाईल वायब्रेट व्हायला लागतो. त्याच्या पांढर्या रंगाच्या शर्टामधून मोबाईलची स्क्रीन स्पष्ट दिसत होती. मोबाईलवर मालक नावाच्या व्यक्तीचा कॉल येत होता.कॅबिनमधून चार मुले आवाज करत खाली उतरतात. ड्रायवर डाव्या हातातून मोबाइल कानाला लावत त्यांना आपला उजव्या हातांनी पाठीमागे जाण्यास हातवारे करतो आणि विनोदपासून दोन तीन पावले दूर जाऊन बोलतो.
“हो सर आताच गाडी पोहचली, मुलेपण कामाला लागलेत. मी तुम्हाला दोन-तीन तासांनी फोन करतो”.
मेल पाहून विनोद द्विधा मनस्थित असतो.
“सर”, ड्रायवर खिशात मोबाईल ठेवत विचारतो. विनोद आपल्याच विचारत असतो.
“सर, आम्ही जाऊया का वर ?” ड्रायवर एकदम जवळ एक फुट अंतरावरून विनोदजवळ येऊन विचारतो. विनोद त्या विचारात ड्रायवरकडे पाहतो आणि मोबाईल लॉक करतो.
“हो चला”.
विनोद जिना चढत पहिल्या मजल्यावर येऊन थांबतो आणि दाराची बेल वाजवतो. त्याच्या पाठीमागे ड्रायवर आणि हातात सेलो टेप आणि फोल्ड केलेले बॉक्स घेऊन चारही मुले येतात. रेखा किचनमधुन येऊन दार उघडते आणि विनोदला पाहते आणि परत किचनमध्ये जाऊन वस्तूंची पॅकिंग करू लागते. रेखालाही हे घर सोडण्याची इच्छा नव्हती. 1 बीएचके मध्ये जायला तिला आवडल नव्हतं, सोसायटीमध्ये ओळखीही झाल्या होत्या. दोन मुले प्रत्येकी एका रूममध्ये आणि दोन हॉलमध्ये सामान पॅक करायला गेले.
दुपारची वेळ झाली होती. “रेखा मी ओनलाइनच खाण्यासाठी मागवतो”, विनोद हॉलमधील कोपर्यात ठेवलेल्या खुर्चीवर बसून विचारतो.
“हो चालेल”, रेखा बाहेर न येता आतूनच म्हणते. विनोद दोन वेज बिर्याणी ऑर्डर करतो आणि तो इंटरव्ह्युचा मेल परत वाचतो. ही जॉब लागणे त्याला खूप गरजेचं होत. शेवटच्या कंपनीत ले-ऑफ झाल्यामुळे त्याचा जास्त फटका सीनियर पोस्टवर असलेल्यांना बसला होता. विनोदला काही कल्पना यायच्या आधीच त्याला कंपनी सोडावी लागली. जॉब जाऊन एक महिना झाला होता. त्यामुळे उद्याची कंपनी त्याच्यासाठी महत्वाची होती.
दरवाज्याची बेल वाजते. विनोद दरवाजा उघडतो आणि बिर्याणी घेतो. त्याच्या पाठोपाठ ड्रायवरपण येतो आणि बेल वाजवतो. विनोद आता चिडून परत दार उघडतो. विनोदचा चेहरा पाहून ड्रायवर म्हणतो, “सॉरी सर, पण मुलांना जेवण्यासाठी बोलवायच होत”. ड्रायवरला पाहून हॉलमधील मूल त्यांच्या साथीदारांना घेऊन खाली जातात. “रेखा बिर्याणी आली आहे. जेवणसाठी टेबल तयार कर”. विनोद दार लावत म्हणतो आणि किचनला लागून असलेल्या डायनिंग टेबलवर बसतो. रेखा दोघांसाठी ताट तयार करते. विनोद फ्रिजमधून पाण्याची बाटली आणतो आणि अर्धी बाटली संपवतो. “रेखा हे काय करताय. जेवणाच्या अगोदरच एवढ पाणी कशाला पिलात”.
“मला खूप भूक नाही. थोडसं दे”. रेखा त्याला त्याच्या म्हणण्यानुसार देते. विनोद नेहमीपेक्षा हळू हळू खातो. दोन-तीन घास खाल्यानंतर तो म्हणतो. “मला बस”.
“तुम्ही काहीच खाल्लं नाही आणि आज सकाळी नाष्टाही केल नाही”
“मला भूकच नाही”
“मला सांगता नक्की काय झाल आहे”
विनोद दोन्ही हात टेबलावर ठेवतो. त्याच्या हातामध्ये अजून न संपलेल ताट असत. “उद्या माझा इंटरव्ह्यु आहे आणि आजचा दिवस ह्यातच जाणार”
“मग त्यात काय झालं, उद्या जर नाही सिलेक्ट नाही झाला तर दुसर्या कंपनीत प्रयत्न करा.”
“आता तुला कस सांगू, मी मागच्या कंपनीत एकाच प्रॉडक्टवर गेली पाच वर्ष काम केल आहे. त्यामुळे माझ अनुभव आणि स्किल्स ह्या प्रॉडक्ट मर्यादित झालं आहे. आणि तुला माहीत आहे मागच्या दोन इंटरव्ह्युचा अजून काहीही फीडबॅक आला नाही.”
“ही उद्याची कंपनी महत्वाची आहे का?” रेखा ताटात स्पून ठेवत बाजूला करत म्हणते.
“महत्वाची म्हणजे माझ आता आत्मविश्वासच राहिला नाही”
“अस का म्हणता तुम्ही तर पूर्ण कॉलेजमधून एकटे ह्या कंपनीत सिलेक्ट झाला होतात”
“तेंव्हाची गोष्ट वेगळी होती.”
“मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे”. रेखा विनोदच्या हातावर हात ठेवते.
दारावर नॉक केल्याचा आवाज येतो. दार अर्धा उघडा असल्यामुळे मुले तो पुढे करत आत येतात. रेखा उठून दोन्ही ताट किचनमध्ये ठेवते. राहायला दोघेच असल्यामुळे दोन तासत सर्व पॅकिंग आणि शिफ्टींग होते. मुले ड्रायवरला फोन करून वर बोलावतात. “सर, सर्व सामान गाडीमध्ये शिफ्ट केलेलं आहे. तुम्ही आणखी काही राहील असेल तर सांगा.
“मला तर काही दिसत नाही.” विनोद रेखाकडे बघत तिचा होकार चेक करतो. रेखा प्रत्येक रूममध्ये जाऊन चेक करते आणि सर्व रूमच्या चाव्या विनोदला देते.
“तुम्हाला कुठे जायचं आहे त्याचा पत्ता माहीत आहे का ?” विनोद विचारतो.
“हो सर”
“तुम्ही चला मग, मी तुमच्या मागे येतो बाईकवर”. ड्रायवर खाली जातो. विनोद मेन दरवाज्याला कुलूप लावूतो. दोघे लिफ्टने लोवर पार्किंगमधील बाईक काढण्यासाठी जातात. गाडी गेटच्या बाहेर असताना विनोद त्याच्या पाठीमागे येऊन निघण्यासाठी सिग्नल देतो. अर्ध्या तासात ते नवीन फ्लॅटवर पोहचतात.
“मालकांचा फोन आला होता. लवकर सामान शिफ्ट करायला सांगितलं आहे. मी पण हातभार लावेल”. ड्रायवर मुलांना सांगतो आणि खाली उतरतो. इथेही फ्लॅट पहिल्या मजल्यावर होता. मुले सामान आणायला सुरुवात करतात. “रात्रीच जेवणपण बाहेरून ऑर्डर करणार आहात का ? रेखा विचारते.
“नाही मॅगी असेल तर मला पुरेसं आहे, तुला काही ऑर्डर करायची आहे का ?
“नाही, मॅगी चालेल, मी बनवते” आठ वाजतात सर्व जड आणि मोठ सामान लावून झालेल असत. विनोदच्या जुन्या बुक्स आणि नोट्सचा बॉक्स तसाच न लावता राहिलेला असतो. “सर हा बॉक्स उघडून पुस्तके कपाटात ठेवू का ?” एक मुलगा विचारतो.
“नाही राहू द्या. आता वेळ झाला आहे”
“मी पेमेंट अगोदर केलेली आहे”, विनोद ड्रायवरला म्हणतो.
“हो सर आमच्या मालकाने सांगितलं आहे. आम्ही निघतो.”
“ओके आणि सॉरी, मी सकाळी जरा काही बोललो किंवा वागलो असेल तर”
“नो प्रॉब्लेम सर.” सर्वजण जायला निघतात.
“एक मिनिट” विनोद पाकीटातून पाचशेची नोट काढून ड्रायवरला देतो.
“थॅंक यू, सर”
रेखा मॅगीला लागेल एवढच साहित्य बाहेर काढून मॅगी बनवते. हॉलमध्ये खाली बसून दोघे मॅगी खातात. दिवसभर किचनमधील सामान काढण्यामुळे रेखा थकलेली होती. तिला सोफ्यावरच झोप लागते. विनोद तिला न उठवता तिला पांघरून घालतो. तोही झोपण्यासाठी जातो आणि त्याच लक्ष त्या बॉक्सकडे जात. रेखा आवाजामुळे उठू नये म्हणून तो बॉक्स आत रूममध्ये नेतो. फ्लोरवर बॉक्स ठेवून उद्यासाठी काही लागणारे बुक्स किंवा नोट्स मिळतील ह्या विचाराने तो बॉक्स उघडून बुक्स बाहेर काढायला लागतो. इंजीनीरिंगमध्ये वापरलेली रेफ्रेन्स बुक्स त्याला दिसतात. त्यावर धूळ पसरलेली असते. ती हाताने झाडत तो एक-एक बूक बाहेर काढतो. त्याची ब्रांच इलेक्ट्रॉनिक्स असल्यामुळे सर्व बुक्स त्याच्यासाठी व्यर्थ होती.
तो दोन्ही हात चेहर्यावर ठेवतो. एक मिनिट तसाच बसून राहिल्यानंतर त्याच लक्ष हातांच्या बोटामधून बॉक्सकडे जात. त्याला बॉक्समध्ये कोपर्यात एक पेन दिसते. तो ती पेन घेतो. त्या पेनच्या टोपणावरील एल अक्षर काहीसं धुसट झालं होत. विनोदने त्या लेक्सि पेनला ओळखल होत. ती हीच पेन होती विनोदला दहावीत असताना सर्वात अवघड प्रश्न सोडवल्याबद्दल पारितोषक म्हणून त्याच्या सरांनी त्याला दिली होत. क्लासमधील सरांसह सर्व मुलांनी उठून टाळ्या वाजवल्या होत्या. हतबल झालेल्या विनोदचे डोळे तो प्रसंग आठवून पाणावले होते. त्याने तो पेन हातात गच्च पकडला होता. ती पेन घेऊन त्याला धीर आला होता. त्याने मनात ठाम केल उद्या काहीही झाल तरी आत्मविश्वासाने समोर जायचं. पेन हातात ठेवून तो तसाच झोपी गेला.