मुंबई-पुणे हायवेवर विक्रम सुसाट कार चालवत होता. सीट-बेल्ट न लावल्यामुळे अधून-मधून बीप-बीप आवाज येत होता. “अरे, ते लाव ना सीट बेल्ट “, डोक्याला हात लावून बसलेला प्रणव कान झाकत म्हणाला.
“हे घे, लाव “, विक्रमने उजव्या हाताने सीट-बेल्ट खेचत पुढे झाला. वायपर पूर्ण वेगात असून देखील काचेवर पाणी कायम राहत होत. “समोर पोलिस आहेत टोल-नाक्यावर, सीट-बेल्ट नीट पुढून लाव. बाजूला घेऊन पकडले तर आयुष्यभरासाठी जेल मध्ये जाव लागेल “, प्रणव मागे बघत म्हणाला.
“तस काही होणार नाही “, विक्रमने गियर तीन वर टाकून सीट-बेल्ट घातला.
“तुला नक्की माहीत आहे का ते ठिकाण ?”
“हो “, गूगल मॅपमध्ये विक्रम पाहत होता.
“मग, एवढे पोलिस कस काय इथे “, काचेवरील धुके पुसत प्रणव म्हणाला.
“रस्त्याच्याकडेला असलेल झाड तोडत आहेत आणि इथे टोल नाका वगैरे काही नाही “, स्टिअरिंगवरुन बोट त्या दिशेला करत विक्रम म्हणाला. प्रणवने परत एक-दोनदा हात फिरवून काचेवर कपाळ टेकवून पाहू लागला.
“बर झालं “, छातीवर हात ठेवून तो मागे टेकून बसला. “आपण सुहासला तिथच सोडून द्यायला हव होत. माझी तर पूर्ण उतरली आहे ”
“वेडा आहेस का, त्याची बॉडी पोलिसांना भेटली तर ते पहिलं आपल्यालाच पकडतील. आपल त्याच्यासोबत भांडण झालेल बारमधील लोकांनी पाहिलं होत ”
“पण ते तर बारच्या बाहेर झालं होत आणि तिथे तर एक-दोन जणच असतील सिगरेट ओढत उभे असलेले. दारू पिल्यावर असे लोक करतात. असच वाटेल सर्वांना ”
“अशी बाचाबाची की त्यामध्ये तू त्याच्या डोक्यावर हेलमेट माराव. मी ही रिस्क घेऊ शकत नाही “, विक्रम ऍक्सिलरेटरवर पाय दाबत गाडी पळवू लागला.
“तू पण काही कमी नाहीस त्याला मारते वेळेस त्याला तूच पकडल होतस “, सिगरेटचा पॅकेट शोधत तो म्हणाला. पॅकेटमधून एक सिगरेट प्रणवने काढली.
“आताच ओढू नकोस ”
“का ?”
विक्रमने कार सर्विस रोडवर वळवली आणि त्याच्या हातातील पॅकेट आपल्या खिशात टाकल. “आपण जवळ आलो आहे ” प्रणवने सिगरेट मुठीत धरून आवळली.
सर्विस रोडवरुन कार कच्च्या रस्त्यावरून आत गेली. आजूबाजूला फक्त झाडी होती. विक्रमने कारचा वेग कमी केला. “चिखलात कार अडकली तर परत कसे जाणार ? ” विक्रम पुटपुटला.
“काय झाल ?”
“हेच आहे ते ठिकाण ?”
ते दोघे कारच्या पाठीमागे उभे होते. विक्रमने डीक्की उघडताना त्याच्या चेहऱ्यावर रक्ताचे थेंब उडाले. पावसामुळे ते पुसायच्या आत धुवूनही गेले. “पकड त्याच्या हाताला ”
“मी नको. त्याच्या हाताला आणि खांद्याला रक्त लागल आहे. मी पाय पकडतो ”
विक्रमने सुहासच्या पायाच्या पाठीमागे हात घातला आणि तिथे असलेल्या स्टेफनी जवळचा मोठ्या बोल्टचा पाना घेतला ”
“हे कशाला ?”
“अस वाटलं पाहिजे की ह्याला काही लोकांनी बेदम मारल आहे. फक्त डोक्यावर जखम नको “, त्याने पाना पाठीमागे खोवला.
विक्रमने सुहासचे हात खेचून त्याला अर्धा बाहेर काढला. सुहासचे पाय खेचताना चिखलामुळे घसरून प्रणव खाली पडला. विक्रमने सुहासच्या बेल्टला पकडून त्याला खाली खेचल. त्याच्या कपाळावर मोठा घाव होता आणि अजून रक्तस्त्राव चालू होता. त्यांनी त्याला रस्त्यावरुन फरफटत आत ओढून नेलं. प्रणवच्या हातातून सुहासचे पाय सटकले, “आणखी किती दूर “, सुहासचा एक बूट त्याच्या हातात राहिला होता.
“झालं, आणखी दहा पावलं “.
प्रणवला दम लागला होता. “बस इथेच “, विक्रमने सुहासला टाकलं.
“इथेच !”, प्रणवने सुहासचे पाय फेकले आणि वाकून दोन्ही हात गुडघ्यावर ठेवून सगळीकडे एक नजर फिरवली. फक्त झाडांवर पडत असलेल्या पावसाचाच आवाज येत होता. तो सुहासला लाथा मारून मोठमोठ्याने हसू लागला. विक्रम मागे उभे राहून त्याला पाहत होता. “पण तुला ही जागा कशी माहीत आणि तो पाना कुठे आहे ?”
“हे घे “, पाठीमागून पाना त्याच्या डोक्यात मारत विक्रम ओरडला. पहिल्या मार्यानेच तो सुहासच्या पायावर कोसळला. विक्रमने तो सुहाससारखा पूर्णपणे शांत होईपर्यंत डोक्यावर मारा चालू ठेवला. पानाला पुसून सुहासच्या हातात ठेऊन तो कारकडे निघाला.
कार सर्विस रोडवरुन परत उलट्या दिशेने निघाली. ट्राफिकमध्ये वाढ झाली होती. समोर गाड्यांची रांग लागली होती. विक्रमने मागे वळून पाहील. त्याच्या मागे अजून कोणती गाडी नव्हती. त्याने कार रिव्हर्स घेत बाजूला पार्क कली. तो बाहेर येऊन पाहू लागला. रस्त्याच्या पलीकडे अर्धवट तुटलेल्या झाडाकडे टॉर्च दाखवत पोलिस तिथेच थांबले होते. विक्रमने खिशातून सिगरेटची पॅकेट काढली. प्रणवच्या हाताने आतले दोन-तीन सिगरेट ओले झाले होते. विक्रमने ते फेकून एक सिगरेट पेटवली आणि कारला टेकून सिगरेट ओढू लागला. ढगांचा गडगडाट सुरू झाला होता. सिगरेट ओढून झाल्यावर ती पायाने विजवून कारचं दार उघडायला तो वळला तेवढ्यात आकाशात लक्ख विजेचा प्रकाश पडला. ते पाहण्यासाठी तो वर बघू लागला. त्याचक्षणी खाली येणार्या दरडमुळे तो प्रकाश मातीच्या काळोखाने झाकून गेला आणि विक्रमला त्याच्यात सामावून घेतलं.