MIDC करंदवाडी

   सक्षमच्या घरी कंपनी जॉइन करण्याच पत्र आल होतं. घरच्यांना आणि शेजार्‍यांना पेढे वाटून तो जाण्याची तयारी करू लागला. आजी मात्र त्याच्या जाण्याने खुश नव्हती. लहान भावाने सायकल स्वछ धुवून काढली होती. “केशव “, आईचा आवाज एकल्यावर पुसण्याचा कापड अर्धवट खाली टाकून तो तिकडं गेला. सायकलच चाक जोरात फिरत होत. त्या फिरण्यामुळे डबल स्टँडवर उभी असलेली सायकल हालत होती. आईच्या पाया पडून आजीकडे वळताच ती म्हणाली, “तुला दुसरी काय मिळणार न्हाय का ?”
“काय कळलं नाही तू काय म्हणते ”
“आपलं दोन एकर हाय. ते चौघांसाठी पुरतय. त्या कंपनीच्या पाठीमाग स्मशानभूमी हायं. किसन म्हणत होता”
“सरकारनं पूर्ण जागा ताब्यात घेऊन टाकलीय. आता स्मशानभूमी राहिली नाय ”
“पण अगोदर होती नव्ह ”
“मला तिथ शिकायला मिळल आणि कंपनीपण चांगली हाय ”
गाईने हंबरडा फोडला. “तू काय एकणार न्हाईस, हे घे जाताना गाईला दे “, जोरात खोकलत आजी म्हणाली. वाटीत चपाती आणि सक्षमने दिलेला पेढा होता. सक्षमने पेढा चपातीच्या आत गुंडाळून गाईच्या तोंडात घातला. कुंकू आणि हळदने माकलेल्या तिच्या कपाळाला हात लावून त्याने नमस्कार केला. सायकलच्या चाकाची गती मंदावली होती. केशवने ब्रेक लावून त्याला थांबवलं. सक्षमने बॅग सायकलच्या कॅरियरवर ठेवली. “केशव तू बॅगला धर “, सायकलच्या उजवीकडे दोन्ही हँडलला पकडून सक्षमने स्टँड काढलं आणि केशव डावीकडे त्याच्या मागे बॅगला धरून चालत होता. आई दारावर तर आजी बाजवर बसून त्यांच्याकडे पाहत होती. गाय मान हलवत रवंथ करत होती.

   बस स्टँडवर आल्यावर दहा रुपये देऊन त्याने केशवला पाठवल. त्याने ते पैसे घेत कैंची स्टाईलमध्ये सायकल पळवत निघून गेला. कसाबसा गर्दीत घुसून सक्षमने जागा मिळवली पण शर्टचा कडकपणा निघून गेला होता. अर्ध्या तासाने बस त्याच्या स्टॉपवर थांबली. मागच इन-शर्ट निघून गेल होत. सरळ पुढे जाऊन लघुशंका करून कपडे व्यवस्थित करत तो रस्त्याच्या कडेला उभा होता. समोर एमआयडीसी करंदवाडी असा बोर्ड कलर न लावलेल्या भिंतीवर लटकवला होता. त्या भिंतीच्या कुंपणाभोवती फक्त उसाने दाटलेली शेती होती.

“कुठे जायचयं ?”, गेटवर उभ्या असलेल्या गार्डने सक्षमला थांबवून विचारलं.
“बायोनिक केमिकल्स. ह्या कंपनीकडे कस जायचं “, त्याने कंपनीच लेटर त्याल दाखवलं. गार्ड लेटर हातात घेऊन काही कळत असल्यासारख बघत होता. “काही अवघड नाही. सरळ ह्या रोडने जा. ही एकच कंपनी चालू आहे इथे. “, सक्षमच नाव एका वहीत लिहत तो म्हणाला. “अजून एक सहा नंतर इथे कोणी थांबत नाही, मी पण ”
रस्त्याच्या आजूबाजूला कंपन्यांचे बोर्ड लावले होते. पण सर्वांच्या मेन दरवाज्यावर कुलूप होत. बायोनिक केमिकल्सच्या गेटवर येऊन तो थांबला. परत एकदा लेटर काढून बोर्डवरील कंपनीच नाव त्याने चेक केलं.

   आत गेल्यावर उजवीकडे मशीनरी चालू होत्या. तिथे दहाजण एखाद्या रोबोटप्रमाणे आपल काम करत होते. फक्त मशीनरीचा आवाज येत होता. सक्षम तिथ आलेला त्यांना माहीत नव्हतं. रेपोर्टिंग टाईम दहा वाजता होत आणि घड्याळात नऊ वाजले होते. डावीकडे जात सक्षम फिरू लागला. तिथे एक मशीन होती आणि एक पुरुष आणि महिला फ्लोर धूत होते. त्याच्या बाजूला सुपरवायझरची रूम होती. अर्ध्या काचेच्या असलेल्या त्या दारावर सुरेश उपाध्ये लिहल होत. रूमबाहेर असलेल्या बाकावर त्याने लेटर असलेली फाइल ठेवली आणि हाताची घडी घालून तो तिथे बसला. फ्लोर साफ करणारे निघून गेले होते. मशीनरीच्या गरमीने त्याला घाम येत होता. तो सेंटरमध्ये असलेल्या फॅनकडे बघू लागला आणि त्याच बटन शोधण्यासाठी सुपरवायझरच्या रूमचा दरवाजा उघडू लागला. एवढ्यात पाचवर फॅन फिरू लागला. सक्षम परत बाकावर येऊन बसला.

   सक्षमला बाकावरच डुलकी लागली होती. रूमच्या दरवाज्याचा आवाज येताच तो खडबडून जागा झाला. एक व्यक्ति इन-शर्ट केलेल्या काळ्या पॅंटमध्ये हात घालून उभी होती. त्याला पाहताच तो उठून उभा राहिला आणि म्हणाला, ” गुड मॉर्निंग सर, मी सक्षम. आज माझा पहिला दिवस आहे. माझ बी.फार्मसी झाल आहे आणि हे लेटर “, सक्षम लेटर दाखवण्यासाठी खाली वाकला.
“थांब थांब. हे सर्व माझ्या केबिनमध्येपण बघू शकतो “. उपाध्ये आत गेले. त्यांच्या पाठोपाठ सक्षम होता. खुर्चीवर बसून उपाध्ये म्हणाले, “तर तू नवीन आहेस इथे. बघू तुझ लेटर “. सक्षमने लेटर काढून त्यांच्यासमोर सरकवल. उपाध्ये ते वाचत होते आणि अधूनमधून सक्षमकडे बघत होते. “छान आणि अभिनंदन ”
“थॅंक यू सर “, सक्षम मागे टेकत व्यवस्थित बसत म्हणाला.
“तू नाश्ता केला आहेस का ? आमच्याकडे सकाळी दहा वाजता नाश्ता मिळतो ”
“मी केलो नाही ”
“मी पण आज माझा डब्बा आणला नाही ”
“माझा डब्बा आहे. उशीर वगैरे झाला तर म्हणून घरच्यांनी दिला आहे. तुमची ईच्छा असेल तर..”
“अरे वा. मग तर आपण इथेच खाऊ. ”
“एक सांगू सर ”
“हो हो “, टाय व्यस्थित करत उपाध्ये म्हणाले.
“तुमचा हसरा चेहरा आहे ”
सक्षमचा डब्बा त्याच्या लेटरवर अर्धा ठेवून ते दोघे खाऊ लागले.
“काय आहे ना सक्षम, मी नेहमी माझ्या स्टाफसोबतच नाश्ता आणि जेवण करतो ”
“ते खूप छान आहे. सर्वांसोबत एकत्रीत जेवण केल पाहिजे. मग आज का नाही करत आहात “,
मागे दारावर कोणी तरी उभ राहून नॉक करत डोकावत होत. सक्षम उठून दरवाजा उघडून बाहेर आला. “तू कोण आहेस मुला ?”, शर्ट आणि पॅंट दोन्ही निळ्या कलरची घातलेली व्यक्ति त्याला म्हणाली.
“मी सक्षम. नवीन आहे. आजच पहिला दिवस. सुपरवायझर उपाध्ये सरांना भेटायला आलो होतो. ”
उजव्या हातातील चाव्यांना घट्ट पकडत ते म्हणाले, “ते अशक्य आहे मुला “. डाव्या हातातील लिफाफ्यामधून फोटोफ्रेम त्यांनी काढला.
“त्यांचं काही दिवसापूर्वीच दुख:द निधन झालं “,

   थरथरणार्‍या हाताने त्याने फोटोला हातात घेतलं. स्मित हास्य करत असलेल्या उपाध्येंच्या फोटोला तो पाहत होता. खाली नाव आणि मृत्यू दिनांक लिहलं होत.
“ह्या मशीनवरील असलेला टान्स्फोर्मर त्यांच्या डोक्यावर पडला होता आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. म्हणूनच ही साफ-सफाई चालू आहे. मी पण त्यांच्या रूमला लॉक करून त्यांच्या घरी तेरव्याला जेवण्यासाठी चाललो होतो. खूप चांगला माणूस होता. आम्ही एकत्र जेवण करायचो .”

   सक्षम कपाळावरील पाण्यांच्या लोंढ्यांना पुसत मागे वळून रिकाम्या खुर्चीकडे आणि आपल्या लेटरवर असलेल्या डब्ब्याकडे निस्तब्ध पाहत होता.
“हे काय केलस मुला ?”
सक्षमच्या हातून उपाध्येंचा फोटो खाली पडला. “माफ करा “, सक्षम फोटो उचलण्यासाठी वाकला. त्या व्यक्तीचे पाय त्याला उलटे दिसले आणि ती व्यक्ति जोरजोरात हसत होती.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *