पलायन

   येरवडा काराग्रहातील सायरन वाजू लागला. पदावर नवीन रुजू झालेले जेलर दीपक दिक्षित तातडीने सुरक्षारक्षकासोबत मीटिंग घेऊन बोलत होते. “हे दोघे पळून कसे गेले ?”
“ह्या दोघांनी अगोदरपण एकदा प्रयत्न केला होता. पण..” दिवेकर म्हणाले
“पण काय ”
“देसाई सर यांची खास नजर होती यांच्यावर. म्हणजे तसे सर्व कैद्यांची माहिती त्यांना इतके वर्ष राहून झाली होती. त्यांच्या कसं लक्षात आल काय माहीत. पळून जाण्याच्या आदल्या दिवशी त्यांना कडक बंदोबस्त असलेल्या रूममध्ये टाकलं ”
“आता इथे देसाई नाहीत “, टेबलावरील त्यांच्या नावाच्या लाकडी प्लेटकडे बोट करत दिक्षित म्हणाले. “त्यांना शोधायच कुठे आणि कस हे महत्त्वाचं आहे. म्हात्रे त्यांची फाईल आणलीत “,
“हो सर, तुमच्या टेबलावर ठेवली आहे ”
देसाई टेबलाभोवती फिरून फाईल घेऊन परत टेबलला टेकून उभे राहत फाईल पाहू लागले.
“सुरेश आणि बळवंत. तर ह्या दोघांना चोरी केल्याबद्दल शिक्षा झाली होती. पण इथे तर तीन जण होते असा उल्लेख आहे ”
“हो सर, तिघे होते. आनंदला जेव्हा इथे कोर्टातून पोलिस कस्टडीत ट्रान्सफर करत असताना त्याने पळण्याचा प्रयत्न केला आणि रस्ता ओलांडताना ट्रकच्या धडक्यात ठार झाला ”
“ह्यांना पळण्याची खूप सवय आहे. ” दिक्षितांनी म्हात्रेला म्हणत फाइलच पुढचं पान पलटवलं.
“आनंदच ह्या टोळीचा मास्टरमाईंड होता. तो एमजी रोडवर किरकोळ वस्तूंचा गाडा चालवत होता. ज्या घरात चोरी केली तिथे फक्त दोन व्रद्ध जोडप राहत होत. ते अधूनमधून तिथे यायचे अमेरिकेहून. त्याने एक महिना त्यांच्यावर पाळत ठेवली होती. त्याच्याबद्दल सर्व माहिती करून घेतली होती. ती चोरीची रक्कम कुठे ठेवली आहे हे फक्त त्यालाच माहिती होत आणि हे दोघं आता अडकून बसले आहेत ”
“ज्या अर्थी हे पळून गेले आहेत. नक्कीच त्यांना रक्कमेबद्दल काही तरी माहीत असणार ” दिक्षित फाइल टेबलवर ठेवत म्हणाले.
“काही सांगता येत नाही सर ”
“ह्या आनंदबद्दल काय. त्याच्या मागे-पुढे कोण आहे आणि त्याची ह्या दोघासोबत कशी ओळख झाली ”
“आनंदबद्दल फारस काही माहिती नाही. तो बिहारहून आला होता. त्याच्या अंत्यविधीसाठी पण कोणी आल नव्हतं. ही दोघ तर किरकोळ चोर्‍या करण्यासाठी प्रसिद्ध होते. अगोदर एका चहाच्या हॉटेलमध्ये काम करताना पोलिस स्टेशनमध्ये चहा द्यायला गेल्यावर आनंदने ह्यांना पाहिलं होत ”
“तुम्ही त्यांचा शोध सुरू करा. मी देसाईकडून माहिती घेतो “, दिक्षित देसाईना फोन लावत म्हणाले.
“हॅलो ”
“हॅलो, मी जेलर दिक्षित बोलतोय येरवडा काराग्रहातून ”
“बोला दिक्षित ”
“तुम्हाला सुरेश आणि बळवंत आठवतात ”
“हो एमजी रोडवरील झालेल्या चोरीत पकडले गेलेले ”
“हो तेच. ते तुरुंगातून पळून गेले आहेत ”
“काय, शेवटी ते यशस्वी झालेच ”
दिक्षितांना हे खटकल. “पण मी त्यांना शोधून काढणारच. मला त्यांच्याबद्दल माहिती हवी होती ”
“मला वाटतं फाइल मध्ये सर्व माहिती आहे ” देसाईपण कडक टोनमध्ये म्हणाले.
“दिवेकर म्हणत होता त्यांनी अगोदरपण पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. पण तुम्ही त्याच्या आदल्या दिवशीच त्यांना कडक बंदोबस्त असलेल्या सेलमध्ये टाकलं. तुम्हाला त्यांचा प्लॅन कसा कळला ”
“सिक्स्थ सेन्स. मला त्यांच्या हालचाली मध्ये फरक वाटत होता. मला एक फोन येत आहे. दोन मिनिट होल्ड करा. ”
“नाही, मी नंतर तुम्हाला फोन करतो काही मदत हवी असेल तर ”
दिक्षितांनी फोन ठेवला आणि म्हात्रेला म्हणाले, “म्हात्रे, गाडी काढ. आपणाला त्या दोघांच्या घरी आणि त्यांना पकडलेल्या पोलिस स्टेशनला जायचं आहे. ”
घोरपडीलगतच्या झोपडपट्टीजवळ आल्यावर म्हात्रेनी गाडी थांबवली. “सर, इथून आपल्याला चालत जाव लागेल. गाडी आत जाणार नाही ”
“तुला घर माहीत आहे ना ?” दिक्षित चश्मा घालत म्हणाले.
“हो सर ”

   छोट्या बोळातून वाट शोधत म्हात्रे चालू लागला. त्यांच्या पाठोपाठ दिक्षित होते. एक बाई दगडावर धुणं धूत असताना कपड्याच पाणी दिक्षित यांच्या अंगावर आल. ” म्हात्रे अजून किती दूर आहे ?” चष्म्यावरील पाणी पुसत दिक्षित म्हणाले. त्यांनी कपड्यावरील पाणी झटकल. “हेच आहे सर ” म्हात्रे थांबून डावीकडे हात दाखवत म्हणाला. म्हात्रे दाराला नॉक करू लागला. सुरेशची बायको बाहेर आली. तिच्या हातात टीव्हीच रीमोट होत. दिक्षितांच लक्ष समोर टीव्हीवर चालू असलेल्या क्राइम पेट्रोल सिरियलवर गेल. “हे आमचे सर आहेत. त्यांना सुरेशबद्दल काही विचारायच आहे ” म्हात्रे म्हणाला.
“सुरेश तुरुंगातून पळाला आहे “, दिक्षित सिरियलवरून नजर तिच्याकडे करत म्हणाले.
“परत त्याच्याबद्दल विचारायला आलात. मी म्हटलं की मला त्याच्याबद्दल काही माहीत नाही ”
“परत म्हणजे ” चश्मा काढत दिक्षित म्हणाले.
“एक तास आधी एक पोलिस इंस्पेक्टर आले होते. ते पण हेच विचारत होते ”
“त्यांची दाढी अमिताभ सारखी होती का ? ” म्हात्रे म्हणाला
“हो, पण काळी ”
“दिवेकर आला होता इथे ” म्हात्रे दिक्षितांकडे बघत म्हणाला.
“जर सुरेशबद्दल काही कळलं तर आम्हाला कळव “. क्राइम पेट्रोल सिरियलमधून ओरडण्याचा आवाज आला.
“बळवंतच घर ह्याच लाईनला पुढे आहे ”
समोर सार्वजनिक हौद असल्यामुळे तिथे सर्वजण कपडे धूत होते. दिक्षित त्याकडे पाहत म्हणाले, “त्याची काही गरज नाही. दिवेकर तिथे पण जाऊन आला असेल. आपल्यात समन्वय असायला हवा ”
“आता कुठे जायचं ”
“एकदा दिवेकरला फोन लावून विचार तो कुठे आहे ” दिक्षित गाडीकडे पुढे चालू लागले. दिक्षित त्या धुणं धुणार्‍या बाईच पाणी चुकवत गाडीजवळ पोहचले.
“सर, दिवेकर आता सुरेश आणि बळवंतला पकडलेल्या पोलिस स्टेशनकडे जात आहे ”
“गाडी तिकडेच घेऊन चल ”
दिवेकर स्टेशनला पोहचला होता. दिक्षितांना पाहताच तो त्यांना सॅल्युट केला. “इथल्या पोलिस स्टेशनचा इंस्पेक्टर माझ्या बॅचचा आहे ”
“गुड, बघू काय माहिती मिळते ”
स्टेशनच्या आत डावीकडे आणि उजवीकडे दोन सेल होते. त्यातल्या उजवीकडील सेलमध्ये एक-दोन फटके मारल्याचा आवाज आला. मधल्या व्यक्तींसोबत इंस्पेक्टर आणि हवालदार चौकशी करत होते. दिवेकरला पाहून इंस्पेक्टर त्या व्यक्तिला आणखी एक फटका मारून बाहेर आला. “विलास, हे जेलर दिक्षित आहेत ”
“हॅलो सर ”
“विलास, आम्ही ते एमजी रोडवरील झालेल्या चोरीबद्दलच्या महितीसाठी आलो आहोत. तुला फोन केला होता ” दिवेकर म्हणाला.
“त्यासाठी सर पण आले आहेत का, तुम्हाला काय माहिती हवी आहे “, इंस्पेक्टर विलास बसण्यासाठी हात करत म्हणाला.
“सुरेश आणि बळवंत पळून गेले आहेत ” दिक्षित म्हणाले.
“काय “, इंस्पेक्टर टेबलावरील फाईल्स चाळू लागला, “ते दोघे सराईत चोर होते. पण पळून जाण्याइतके नव्हते ”
“तुम्हाला चोरीची माहिती कशी कळली, त्या व्रद्ध जोडप्यांनी तक्रार केव्हा दाखल केली होती ?”
“आम्हाला चोरी झाल्याच्या दिवशीच फोन आला होता. किंबहुना चोरी होतानाच ”
“कोणी केला कॉल ? ” दिक्षित पुढे झुकत टेबलवर दोन्ही हात ठेवत म्हणाले.
“तो नंबर ट्रेस नाही झाला. पोलिस स्टेशनवरुन ते घर जवळ असल्यामुळे आम्ही लगेच पोहचलो आणि त्यांना रंगे हात पकडलं ”
“ह्या सीनमध्ये आपण वेळेवर पोहचलो “, मागे उभा असलेला म्हात्रे हसत म्हणाला. दिक्षित त्याच्याकडे बघताच तो शांत झाला.
“मी ही फाईल घेऊ शकतो ?”
इन्स्पेक्टर थोड वेळ विचार करून म्हणाला, “हो..पण ते आता पळून गेले आहेत म्हटल्यावर आम्हाला पण त्यांची माहिती लागेल ”
“मी दोन दिवसात परत देईन ”
“ओके ”
“म्हात्रे फाईल घे ”
पोलिस स्टेशनबाहेर काही वर्तमानपत्राचे लोक माईक आणि छोट्या आकाराची चिठ्ठी असलेल नोटबूक घेऊन उभे होते. प्रत्येकजण त्यांच्या कॅमेरावाल्यासमोर बातमी सांगत होता. “हे दोघ पळून गेलेलं ह्या लोकांना माहीत नाही ना अजून ? ”
“नाही सर ”
“ठीक आहे “, दिक्षितांनी गाडीचं दार उघडल, “आणि उद्या कधी कळलं तरी फक्त तपास चालू आहे अस सांगत जा ”
गाडी काराग्रहात आली. “दिवेकर आणि म्हात्रे तुम्ही तपासाला लागा आणि मला अपडेट देत रहा “.

   दिक्षित त्यांच्या कॅबिनमध्ये येऊन फाईल चेक करू लागले. त्यांनी मोबाइलवरुन फाइलमध्ये पाहत मेसेज केला. काही मिनिटांनी त्यांच्या मोबाईलवर रिंग टोन वाजू लागली. “बोल ” दिक्षित फाइलमध्ये असलेल्या त्या मोबाईल नंबरकडे पाहत म्हणाले.
“तो नंबर अमेरिकेचा आहे “, तिकडून आवाज आला.
“काय, ओके ”

   त्या रात्री दिक्षित त्यांच्या पर्सनल कारने एमजी रोडवरील चोरी झालेल्या घराकडे गेले. घराजवळ आल्यावर त्यांनी कारच्या लाइट्स बंद केल्या आणि कमी स्पीडवर कारमधून एक राऊंड मारून घरामध्ये कोणी नाही ह्याची खात्री केली. कारला घराच्या बाजूला असलेल्या रोडवर पार्क करत असताना समोरच्या घरातील कुत्रा भुंकू लागला. दिक्षित धावत असताना त्यांच्या डोक्यावरील काळ्या रंगाची टोपी खाली पडली. रस्ता ओलांडून ते घरच्या आत गेटमध्ये शिरले. पण घराच्या डाव्या एका कोपर्‍यावर सीसीटीव्ही कॅमेरा असल्याच त्यांच्या लक्षात आल. त्यांनी जवळ पडलेल एक दगड उचलल आणि गेटच्या बाहेर आले. तो कुत्रा अजून तिथेच उभा होता. त्यांनी तो दगड त्याच्याकडे भिरकवला तसा तो मागे फिरला. त्यांनी रस्त्यावर पडलेली टोपी उचलली आणि परत आत गेले.
“शे..” जॅकेटमध्ये हात घालून चाचपत म्हणाले. त्यांनी मोबाईलमधील फ्लॅशलाइट चालू केल. एका हाताने लॉक निघत नव्हता. तोंड मोठ करून त्यांनी जाड कव्हर असलेला मोबाइल तोंडात धरला आणि दोन्ही हातांनी पिनाचा वापर करून आत शिरले. त्यांनी नाकाला हात लावत पुढे हॉलमध्ये गेले.
हॉलमध्ये टीव्हीच्या बाजूला असलेल्या टेबलवर एक फोटो फ्रेम होता. त्या व्रद्ध जोडप्यांसोबत एका मुलगा होता. तो दोघांच्या खांद्यावर हात ठेवून उभा होता. मागे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी त्या मुलाच्या डोक्यावर दिसत होत. दिक्षितांनी फ्लॅश ऑन ठेवत एक फोटो काढला आणि तो फोटो त्या टेबलवर ठेवला. त्याच टेबलाच ड्रॉवर उघडून आत असलेल सामान ते सरकवू लागले. काही पेन, स्टॅप्लर आणि विझाचे डॉक्युमेंट्स आत पडलेले होते. त्यांनी ते हातात घेऊन एक नजर त्यावरुन फिरवली. तोच बाहेर असलेल्या छोट्या बागेतील कुजलेल्या पालापाचोळ्यांचा आवाज आला.

   दिक्षितांनी तो डॉक्युमेंट आत ठेवून ड्रॉवर अर्धा झाकला आणि हॉलला लागून असलेल्या किचनमध्ये पळ काढला. उघड असलेल दार पहिलं तर नक्की कोणी तर आत असणार असा संशय त्यांना येईल अस दिक्षितांना वाटलं. पण हॉलमधील पडद्याच्या हालचाली वाढल्या होत्या. हवा तर इतकी जोरात नव्हती आणि खिडकीही बंद होती. त्याच खिडकीतून सुरेश आणि बळवंत यांनी हॉलमध्ये उडी मारली.
“बळ्या हळू “,
त्याला मधेच थांबवत तोंडावर बोट ठेवून बळवंत म्हणाला, “शशश…तुला किती वेळा सांगितलं अश्या वेळेस नाव घेऊ नकोस म्हणून ”
“ओके जय “. सुरेश त्याच्या बुटाला लागलेली घाण हॉलमधील असलेल्या मॅटवर घासू लागला. “ह्या आनंद..म्हणजे ठाकुरने आपल्याला कामाला लावलं, पण हिस्सा स्वत:ही घेतला नाही आपल्यालाही घेऊ दिला नाही. हे बर आहे शोलेचे नाव घेण जे आपल्याला लागू होत. आपण दोघे जय-वीरू सारखे कैदी आणि पळून पण आलो ”
“परत आत जायला वेळ लागणार नाही. लवकर आपल्या काही कामाचं मिळत का बघ. आनंदने नक्कीच काही तरी गेम केला आहे “, सुरेश हॉलमधून किचनच्या दिशेने चालत म्हणू लागला. दिक्षितांनी आपल रिवॉल्वर बाहेर काढलं. सुरेश दिक्षितांपासून चार पाऊलेच दूर होता. दिक्षितांनी रिवॉल्वर घट्ट पकडल.
“हे बघ “, ड्रॉवरमधून दिक्षितांनी बघितलेली डॉक्युमेंट्स बाहेर काढून बळवंत म्हणाला. सुरेश माघारी परतला आणि ते डॉक्युमेंट्स घेत त्यावर एक नजर टाकली. “तुला कळते का काय आहे हे ”
“काय ”
“हे इंग्रजीमध्ये आहे. तुला आणि मला दोघांना कळलं असत तर असे चोर्‍या करत फिरलो नसतो. ठेव ते आत ”
बाहेर सायरनचा आवाज आला. “पोलिस आले की काय “, बळवंत म्हणाला. सुरेश हळूच खिडकीचा पडदा सरकवून बघू लागला. “अॅम्ब्युलेन्स होती. पण आपण निघूया. पोलिसांना माहिती आहे आपण फरार आहोत. ते इथे चकरा मारतील “. ते दोघे गेल्यावर दिक्षितांनी ड्रॉवरमधील डॉक्युमेंट्सचे फोटो काढले आणि तिथून बाहेर पडले.

   दुसर्‍या दिवशी त्या फोटो काढलेल्या डॉक्युमेंट्सची झेरॉक्स घेऊन ते काराग्रहाकडे निघाले. पार्किंग करून निघताना त्यांना दूर एक अम्बॅसडर दिसली. कॅबिनमध्ये आल्यावर त्यांनी म्हात्रेला विचारलं, “बाहेर कार कोणाची आहे ?”
“माहिती नाही सर ”
“त्याच नंबर नोट करून घे आणि मला सांग ”
दिक्षित डॉक्युमेंट्स पाहत होते. त्यात अमेरीकेच्या व्हिसाचे आणि विमानाच्या तिकिटाचे झेरॉक्स वगैरे होते. दिक्षित त्याकडे पाहत विचारात मग्न होते. त्या डॉक्युमेंट्स वर म्हात्रेने एक चिठ्ठी ठेवली. “हे काय म्हात्रे ” मीच असा आवाज करत दिक्षित म्हणाले.
“सॉरी सर, हा आहे नंबर ”
“ठीक आहे जा तू “, दिक्षितनी ते नंबर पहिलं आणि बाजूला ठेवून परत डॉक्युमेंट्स वर लक्ष केन्द्रित केल. पण ते काही होऊ शकल नाही. टेबलवरील लँडलाइन वाजत होता. “हॅलो ”
“सर, आम्ही शोध घेत आहोत “, दिक्षित ताठ होऊन खुर्चीवर बसले.
“कोण सर ”
“कधी येणार आहेत ?”
“ओके सर ”
त्यांनी फोन करून म्हात्रेला आत बोलावलं. “आपल एक पथक घेऊन ज्या पोलिस स्टेशनमध्ये वाटतय माहिती मिळेल तिथे जा आणि त्यांनादेखील सुरेश आणि बळवंतचा शोध वाढवायला सांग ”
“हे तर साधे चोर आहेत. एवढ काय ह्यांच्या मागे. असेही ती परत काहीतरी गुन्हा करून इथेच येणार आहेत ”
दिक्षित म्हात्रेकडे रागाने बघत होते. “सॉरी सर ”
“ते मला पण माहीत आहे. पण वरुन साहेबांचा फोन आला होता. ज्या घरात चोरी झाली. ते त्यांचे मित्र आहेत आणि ते इथे पुण्याला येणार आहेत. ते अमेरिकन मराठी मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यांच काहीतरी कार्यक्रम होणार आहेत. तिथे जर कळलं की आपण जर अजून त्यांना पडकल नाही तर मीडियामध्ये बातमी जाईल ”
“ओके सर ”

   दिक्षितांनी मोबाईलवर सुधीर दारे सर्च केल. फेसबूकवर त्यांना सुधीर दातेचे प्रोफाईल्स दिसत होते. चश्मा घातलेला आणि पांढरे केस असलेला पहिला प्रोफाईल त्यांनी उघडल. त्यात घरात जे स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा फोटो होता तो फोटो तिथे त्यांना दिसला. खाली स्क्रोल करत ते आणखी पाहू लागले. एका फोटोवर येऊन ते थांबले. त्यांनी तो फोटो सेव करून सायबर डिपार्टमेंटच्या रूममध्ये गेले. तिथे त्यांनी तो फोटो अपलोड करून पोलिस डेटाबेसमध्ये सर्च करू लागले. स्क्रीनवरील रिजल्ट पाहून ते तातडीने बाहेर आले आणि त्यांच्या टेबलवरील डॉक्युमेंट्स परत बारकाईने पाहून लागले.

   त्यांनी लँडलाईनवरुन एक नंबर डायल केला. “हॅलो मी येरवाडा काराग्रहाचा जेलर दिक्षित बोलत आहे. मला एक माहिती हवी होती. अमेरिकन मराठी मंडळचा कार्यकामाबद्दल माहिती हवी होती ”
“सर ते एका आठवड्यापूर्वी म्हणजे १४ ऑक्टोबर रोजी होणार होता पण दारेंनी ते पुढे ढकललं ”
“ओके मला अमेरिकतल्या मंडळाचा फोन नंबर मिळेल का ?”
त्यांनी त्या फोनवर कॉल करून झाल्यावर शांतपणे त्यांच्या खुर्चीवर बसले. संध्याकाळी जातेवेळेस म्हात्रे त्यांच्याकडे आला. “सर मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे जाऊन पाहिलं पण काही ठोस माहिती मिळाली नाही आणि पोलिस स्टेशनला भेट देऊन शोध वाढवायला सांगितल आहे ”
“ओके शोध चालू ठेवा. मी दोन दिवस रजा घेणार आहे. मी त्या अमेरिकन मराठी मंडळाच्या कार्यक्रमामध्ये भेटतो ”

   ठरल्या वेळेप्रमाणे संध्याकाळी सहा वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. दारेंनी काही यशस्वी मराठी अमेरिकन मुला-मुलींचे सत्कार केले. दारे जिथे बसून जेवण करत होते. तिथे बरीच मंडळी जाता-येता त्यांच्याशी बोलत होती. दारे सर्वांना निरोप देऊन त्यांच्या घरी गेले. त्यांचा ड्रायवर त्यांना सोडून निघून गेला. दारे आत येऊन लाईटच बटन चालू करण्यासाठी प्रयत्न करत होते. पण लाईट लागत नव्हती. “ह्या चोरांनी लाईट पण चोरून नेली वाटत “. त्यांनी मोबाईलच टॉर्च लावला तोच त्यांच्यासमोर एक बंदूक त्यांच्या कपाळावर ठेवून एक व्यक्ती उभी होती. “तू…तुम्ही “,
“त्या व्यक्तीच्या पाठीमागे दिक्षित त्यांची बंदूक ठेवून म्हणाले “, “स्टॉप. मिस्टर देसाई ”
म्हात्रे बळवंत आणि सुरेशला घेऊन दारेंच्या घरी आला. “मेन स्विच ऑन कर “,
“देसाई सर तुम्ही इथे ?”
“हेच आहेत ह्या सर्व कामाचे मास्टरमाईंड ”
“म्हणजे ”
देसाईच्या हातातील बंदूक दिक्षितांनी त्यांच्या रुमालात घेतली. “देसाईला त्यांच्या प्लॅनमध्ये कोणी तरी प्यादे म्हणून हवे होते. बळवंत आणि सुरेशवर त्यांनी नजर ठेवली होती. कारण हे दोघे आपल्या जेलचे नेहमीचे पाहुणे आहेत. आनंदला कळलं होत की हयांच प्लॅन दारेंना मारून ह्या तिघांना खुनाच्या आरोपाखाली आत टाकायच. तो हे कळल्यानंतर पळण्याचा प्रयत्न केला पण बिचारा ट्रकखाली येऊन तो गेला ”
“कळलं नाही सर ह्यांनीच तर ते पळून जाऊ नये म्हणून त्यांना एका स्वतंत्र अशा जास्त सुरक्षा असलेल्या रूम मध्ये ठेवलं होत ”
“हो कारण अमेरिकन मराठी मंडळाच कार्यक्रम पुढे ढकललं ”
“सर अजून काही कळत नाही. देसाईंचा, मंडळाचा आणि ह्या दोघांच काय संबध ”
“दारेंचा मुलगा आणि देसाईची मुलगी लिव-इन-रेलेशनशिप मध्ये अमेरिकेत राहत होते. ते लग्न देखील करणार होते. पण दारेंनी ह्याला विरोध केला. ह्यांची मुलगी हे सहन करू शकली नाही. दारेंनी लगेचच ह्यांच्या मुलाचं दुसर्‍या एका मुलीशी एंगेजमेंटचा मुहूर्त ठरवून टाकला. ही बातमी एकूण ती मानसिकद्र्ष्ट्या इतकी खचली की तिला मनोरुग्णाच्या हॉस्पिटलमध्ये दाखल कराव लागलं. म्हणून त्यांनी तिला अमेरिकेहून इथे पुण्यात आणलं आणि कुठे ठेवलं माहीत आहे ?”
“कुठे सर ?”
“आपल्या जेलच्या बाजूच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये. मी तुला जी कार पाहायला सांगितलो ती ह्यांची होती. ते रीटायर झाल्यावर इथे कार पार्क करून मेंटल हॉस्पिटलमध्ये तिला भेटायला जायचे ”
“काय ह्यांची मुलगी मेंटल हॉस्पिटलमध्ये ”
“हो ते पण तुझ्यामुळे “, देसाई आवाज मोठा करत दारेंच्या अंगावर येण्यासाठी पुढे धावले. देसाईंचे डोळे लाल पण पाणावलेले होते.
म्हात्रेनी देसाईना पकडल. “देसाई सर आम्हाला बळजबरी करायला लावू नका “. त्याने देसाईना बेड्या घातल्या.
“मला माफ करा. मला तुमच्या मुलीला त्रास द्यायचा नव्हता “, दारे हात जोडून उभा होता.
“घेऊन जा ह्या दोघांना परत काराग्रहामध्ये आणि त्यांना अतिसुरक्षा असलेल्या रूममध्येच ठेवा ”
“हे दोघे ह्याच मार्गावर सापडतील हे तुम्ही मला सांगितलं होत. हे तुम्हाला कस कळलं “, त्या दोघांना बेड्या घालत म्हात्रेनी विचारलं.
“देसाईंनी अमेरिकेच्या नंबरहून एका खबरीला फोन केला होता. जो ह्यांना ओळखत होता. त्यानेच ह्यांना इथे पैसे लपवले आहेत असे संगितले. पण हे तर अति उतावळे आहेत, काही दिवसापूर्वीच इथे ह्यांनी चक्कर मारली होती “, दिक्षित खिडकीकडे बघून सुरेश आणि बळवंत ह्यांच्याकडे पाहत होते. ते दोघे खिडकीकडे बघून खाली मान घालून उभे होते.
“आणि देसाईंना ”
“पोलिस कस्टडीमध्ये ”

   दुसर्‍या दिवशी दिक्षित ताठ मानेने त्यांच्या कॅबिनकडे जात होते. वाटेत असलेल्या अतिसुरक्षा रूममध्ये असलेला बळवंत आणि सुरेश त्यांना येताना पाहून हसत होते. त्यांनी त्या दोघांना दुर्लक्ष करत आपल्या कॅबिनमध्ये गेले. थोड्या वेळाने धावत म्हात्रे दिक्षितांच्या तिथे आला. ते देसाईंच्या फाईलला डॉक्युमेंट्स लावत होते. शेवटचं डॉक्युमेंट होत. “म्हात्रे काय झालं. काल झोप झाली नाही. अजून काही प्रश्न आहेत का? विचार ”
“विचारायच नाही सर सांगायचं आहे. देसाई पोलिस कस्टडीमधुन फरार आहेत ”
“काय आणि कधी ”
“काल रात्री ”
“लवकर जा आणि मेंटल हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांच्या मुलीबद्दल चौकशी कर ”
“ती पण नाही तिथे ”
दिक्षितांनी शेवटचं डॉक्युमेंट लावून ती फाईल बंद करून टेबलवर ठेवली.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *