आरश्यासमोर उभा राहून दिनेश नव्या कपड्यांवर स्प्रे मारत होता. त्या स्प्रेच्या वासाने हॉलमध्ये बसलेल्या माधवला खोकला लागला. “किती स्प्रे मारत आहेस. खिडक्या उघड्या करून मार “, हॉलमधील असलेला स्लायडर सरकवत माधव म्हणाला. फॅनची स्पीड वाढवण्यासाठी तो गोलाकार बटन फिरवू लागला. पण फॅनची स्पीड आहे तिच होती. “फॅनची स्पीड का वाढत नाही?”
“ती नाही वाढत दोन वरच असते कायम “, दिनेशने आता दोन्ही बगलत स्प्रे मारायला सुरुवात केली.
माधवने हॉलचा दार उघडून ठेवला. बाजूला असलेल्या ऑफिसला चहा देण्यासाठी आलेला मुलगा त्याला जाताना दिसला. “ओ चहा आहे का ?”, खुर्चीवर मांडी घालून बसलेला माधव जमिनीवर दोन्ही पाय एकदम ठेवून धावत बाहेर गेला. तो मुलगा त्याला पाहताच चहाच्या थर्मासने बंद होणार्या लिफ्टला थांबवलं. “किती पाहिजे?”
“एक कटींग. किती रुपये?”
“दहा रुपये ”
बसून चुरगळलेली दहाची नोट त्याने मागच्या खिशातून काढून त्याला दिली आणि आत येऊन चहा पिऊ लागला. “आता कशाला चहा पित आहेस आपण थोड्या वेळात पिणार आहोतच ”
“सहाला चहा हवा. पण संध्याकाळी सहसा कोणी बोलवत नाही ”
“पण त्यांनी संध्याकाळी सात वाजताच या म्हंटलं आहे. तू पण तयार हो लगेच. माझ झालं ”
“हो एवढा चहा संपू दे “, चहाचा आस्वाद घेत माधव म्हणाला. दिनेशने त्याच्या मागे असलेली खुर्ची खेचली आणि त्यावर बसला. “अरे त्यावर माझे ईस्त्री केलेले कपडे..”, माधवचा अर्धा राहिलेला चहाचा घोट बोलताना त्याच्या टी-शर्टवर पडला. दिनेशने कपडे उचलून टेबलवर ठेवले. तो गूगल मॅपवर लोकेशन पाहू लागला. “इथून पाऊण तास दाखवत आहे. आपण आता निघालो तर पोहचू वेळेवर ”
माधव टी-शर्टवर जिथे चहाचे डाग पडले होते तिथे पाणी टाकत होता. तो टेबलवरील कपडे घेऊन रूममध्ये गेला. दिनेशच्या मोबाईल स्क्रीनवर बॅटरी लो असलेलं नोटिफिकेशन आलं. पंधरा टक्के बॅटरी होती. त्याने चार्जरला फोन लावून बटन दाबतो तोच फॅन बंद झाला. “ह्याला पण आताच जायचं होत “. त्याने मोबाईल लोकेशन परत चेक केल आणि मोबाईल खिशात घातला. “हे काय इतका फॉर्मल ड्रेस. सेल्समन दिसत आहेस ”
“असू दे. ते काही मला पाहणार नाहीत ”
“लेट्स गो “,माधवने फेकलेली बाईकची चावी झेलत दिनेश म्हणाला.
“पण मी आलं तर चालेल ना. म्हणजे तुझ्या घरचे कोणी आले नाहीत म्हणून विचारत आहे “, लिफ्टच्या दाराच बटन दाबत माधव म्हणाला.
“काही नाही होत. हे पहिलं आहे म्हणून तुला घेतलो आहे. अजून माझच काही नक्की नाही ”
“बाईक तू चालवतो का मी चालवू “, माधव म्हणाला.
“तू चालव. पण मला तुझा फोन पाहिजे. माझ्या मोबाईलची बॅटरी लो आहे ”
“अगोदर सांगायचं ना. मी पण रिचार्ज नाही मारला. कालच माझा नेट पॅक संपला आहे. तुला पत्ता माहीत आहे का?”
“हो माहीत आहे आणि मी पाहिलं आहे निघताना. फक्त शेवटचं एक किलोमीटर अंतर माहीत नाही. जर कुठे कळलं नाही तर मॅपमध्ये बघू ”
“नक्की ना.. नाहीतर मी रिचार्ज मारतो “, बाईकच स्टँड काढत माधव म्हणाला.
“आता नको अगोदरच वेळ वाया चालला आहे ”
दहा किलोमीटर अंतर पार केल्यावर माधवने बाईकची स्पीड कमी केली. “हा तर सिटिचा नवीन भाग आहे. अजून किती किलोमीटर असेल “,
“दोन किलोमीटर ” लेक सिटी दोन किलोमीटर लिहलेल्या बोर्डकडे बघत दिनेश म्हणाला.
माधवने बाईक थांबवली आणि म्हणाला. “हे समोर वाय आकाराचा रोड आहे. कुठून जायचं ?”
“दिनेश “, माधव मागे वळून परत म्हणाला.
दिनेश मोबाइलवरील बटणे दाबू लागला पण त्याची स्क्रीन बंद पडली. “थांब तेच आठवतोय. पूल दिसलेला आठवतोय मला. त्या डाव्या बाजूचा पूल दिसतो आहे तिथून घे “. पूल संपल्यावर शेवटच्या टोकाला एक बिना कलरची ईमारत होती. त्या ईमारतीच्या बाजूला निळ्या कलरच्या लोखंडी पत्र्याच कुंपण होत. माधव खाली उतरून मेनगेटवर गेला. “इथे कोणी दिसत नाही ”
माधवने बाईक त्या कुंपणाजवळ पार्क केली. “बिल्डिंग नवीन आहे वाटतं “, दिनेश वर पाहत म्हणाला.
“खूपच नवीन वाटतेय. अजून कलरपण दिलं नाही ”
“हे काय लिफ्ट बंद आहे “, दोन-तीन वेळा बटन दाबून माधव म्हणाला. “कितवा मजला आहे ”
“सातवा ”
“मी दाबून नाश्ता करणार, चहाला बिस्किट असतील तर ते पण सोडणार नाही ”
“अगोदर वर तर जाऊ “, पायर्यांकडे पाहत दिनेश म्हणाला.
“खूप शांतता दिसतेय “, तीन मजले चढल्यावर माधव म्हणाला. तो लॉबीमध्ये येत पाहू लागला. फ्लॅट नंबर-३०० समोर दोन स्लीप्पर त्याला दिसले. “काय झालं. काय पाहत आहेस “, दिनेश अर्ध्या पायर्या चढून वर गेला होता. “काही नाही, आलो “. सहाव्या मजल्यावर येईपर्यन्त दोघांना घाम फुटला होता. “कितव्या मजल्यावर आलो आहे “, एका पायरीवर बसत माधव म्हणाला.
“सहावा आहे वाटतं “,
“वाटतं म्हणजे ”
“मी चौथ्या मजल्यानंतर मोजायला विसरलो आणि आता माझा मोबाईल पण स्विच-ऑफ झाला आहे ”
माधव उठून लॉबीमध्ये गेला. ” इथे तर दारांना कुलूप आहे आणि नंबरपण टाकले नाहीत ”
“चल वरचा मजला नक्की सातवा असेल “. माधव मोठा श्वास घेत दिनेशच्या पाठीमागे गेला.
दोघे धापा टाकत लॉबीमध्ये पोहचले. “हा आहे फ्लॅट नंबर ७०२ “, डावीकडे पाहत दिनेश म्हणाला.
“नशीब ह्यावर नंबर टाकलं आहे. पण हा फ्लॅट रिकामा दिसत आहेत “, माधव उजवीकडे असलेला ७०१ कडे जात म्हणाला.
“तिकडे काय करतोस. आधीच थकलोय. इकडे ये आणि सांग मी कसा दिसतोय “, रुमालाने चेहर्यावरील घाम पुसत दिनेश म्हणाला.
माधव अर्ध्यातून फिरून त्याच्याकडे आला. “चेहरा व्यवस्थित आहे पण स्प्रेचा परिणाम गेला “, नाकाला हात लावत दिनेश म्हणाला.
दिनेश बेल वाजवून थांबला. काही सेकंद झाले ते दोघे तिथेच दारासमोर उभे होते. माधव आणि दिनेश एकमेकांना बघत होते. “थांब लाईट गेली असेल, दारावर नॉक कर “, परत बेल वाजवण्यासाठी जाणार्या दिनेशला थांबवत माधव म्हणाला. तो दारावर नॉक करणार तोच दार उघडला गेला. हॉलमध्ये अंधार होता. “चल आत “, माधव त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. समोर मेणबत्ती घेऊन साडीमध्ये एक मुलगी आली. तिने मेणबत्ती हॉलमधील टेबलावर ठेवली. “आमच्याकडे सध्या लाईट नाही. काय आहे ना, अजून काम पूर्ण झालं नाही ”
“काही हरकत नाही “, ते दोघे सोफ्यावर बसले. बसताना सोफ्याला कव्हर केलेल्या कॅरिबॅगचा आवाज आला. त्या मुलीने किचनमधून दोन ग्लास पाणी आणलं. तिच्या पैंजणींचा आवाज येत होता. “मी सुनैना “, ग्लास दिनेशला देत म्हणाली.
“मी दिनेश “, तो मेणबत्तीच्या प्रकाशात तिला व्यवस्थित पाहण्याचा प्रयत्न करत होता. “हा माझा मित्र माधव “. माधवने मात्र स्वत: पाण्याचा ग्लास घेतला. “घरात कोण-कोण असतं. म्हणजे तुझे आई-बाबा दिसत नाहीत ”
एका रूममध्ये कोणी तरी खोकलत होतं. “ते माझे आजोबा आहेत. जरा आजारी आहेत सध्या ”
“आराम करू दे त्यांना ?”
“कोण आहे ?”, आजोबा आतून म्हणाले.
“हे आलेत ”
“तुला काय वाटतय ”
“मला पसंद आहे ”
“तुम्हाला काय वाटतय ?”
“सॉरी “, दिनेशला ठसका लागला.
“माझ्याबद्दल काय वाटतय ”
दिनेश माधवकडे पाहत होता. माधवने हातातील ग्लास टेबलवर ठेवला आणि व्यवस्थित बसला.
“मला पसंद आहे म्हणा “, केविलवाण्या स्वरात ती म्हणाली.
“मी कळवतो. निघतो आता आम्ही ”
“मला पसंद आहे म्हणा “, तिच्या आवाज पुरुषासारखा झाला. माधव दोन्ही हात सोफ्यावर ठेवून उठण्याच्या अवस्थेत होता. तो दिनेशच्या कानावाजवळ पुटपुटला, “लगेच निघूया ”
“मला पसंद आहे म्हणा “, तो आवाज आता प्रचंड मोठा आणि घोगरा झाला होता. आतील खोकलण्याचा आवाज पूर्ण फ्लॅटमध्ये घुमत होता. पायर्यावरुन येणार्या काठीच्या आवाजाने हे सर्व शांत झालं.
“तुम्ही दोघे कोण आहात आणि इथे काय करत आहात ?”, उघडा असलेला फ्लॅटचा दार पाहून सेक्युरिटी गार्डने विचारलं. ते दोघे गार्डला चुकवत सर्व जोर लावून धावू लागले. बघता बघता ते ग्राऊंड फ्लोरला पोहचले. माधव बाहेर बाईक पार्क केलेल्या निळ्या भिंतीच्या कुंपणाला टेकून खाली बसला होता. दिनेश दोन्ही हात गुडघ्यावर ठेवून खाली जमिनीकडे पाहत मोठयाने श्वास घेत होता. त्याच्या चेहरावरील घामाचे लोंढे खाली पडत होते. तो गार्ड त्यांच्या पाठीमागे धावत तिथे आला. “तुम्ही दोघे कोण आहात आणि इथे काय करत होतात आणि असे पळत का सुटलात?”, काठी जमिनीवर आपटत तो म्हणाला.
“आम्ही सुनैना हिला भेटायला आलो होतो ”
“कोण सुनैना ?”
“फ्लॅट नंबर ७०२ ”
“तिथे ह्या नावच कोणी राहत नाही. तो फ्लॅट अजून विकायचा आहे “,
माधव हे ऐकूण कसाबसा उठला आणि म्हणाला, “मग तो सोफा कोणाचा आहे ?”
“तो समोरच्या ७०१ चा. आजच आणला आहे. फर्निचरवाल्यांनी चुकून तिथे ठेवला ”
“म्हणजे मधुमती अपार्टमेंट्स नाही का हे ?”, दिनेश सरळ उभा राहत म्हणाला.
“अगोदर हे सांगा तुम्हाला अनुमति कोण दिलं. हे मधूमती नाही लेकव्यूव्ह सोसायटी आहे. मधुमती पुलाच्या पलीकडे आहे आणि तुम्ही इथून निघा लवकर नाहीतर पोलिस मला रागावतील “, समोरून येणार्या जेसीबीकडे बघत गार्ड म्हणाला.
“दिनेश चल निघू इथून “, माधव बाईकवर बसत म्हणाला.
“पोलिस गाडी नाही ती ”
“दिसतय मला. एवढं कळलं नसत तर गार्ड नसतो. दोन दिवसापूर्वी एक कार पाण्यात पडली इथे “, समोरच्या पूलाकडे बोट करत गार्ड म्हणाला.
“दिनेश बाईकवर बसतोस का ?”
“काय ”
“दोनजण होते त्यामध्ये. कोण होत हे अजून कळलं नाही. पण एक महिला होती अस पोलिस म्हणत होते. लई पॅक केलेल्या साड्या आणि थोडे गड्यांचे कपडे तरंगून वर आले होते काल ”
जेसीबी चालवणारा उडी मारून खाली उतरला आणि ह्यांच्याकडे आला. “तात्या तांबखू आहे का आणि हे कोण हाईत ?”
वरच्या खिशाच बटन काढून तंबाखूची पुडी त्याला देत गार्ड म्हणाला, “रस्ता चुकले होते ”
दिनेश बाईकवर बसला. तंबाखू हातावर ठेऊन मळत तो म्हणाला, “पोलिस म्हटले मला आज काही करून कार बाहेर काढायची. कोण तर एक जोडप आलं होत स्टेशनमध्ये. म्हणत होतं माझी मुलगी होती तिच्यामध्ये. काय बार नाव. ह्ं..सुनईना ”
हे ऐकूण स्टँड न काढताच माधव बाईक धावू लागला. दिनेशचं लक्ष पाण्याकडे गेलं. तिथे एक लाल साडी त्यांच्या दिशेने तरंगत होती. “बाईक थांबव ”
“का? ”
“ती बघ साडी तरंगत आहे ”
“मला काही बघण्याची इच्छा नाही “, अस म्हणत तिरक्या नजरेने पाहत माधव बाईक चालवत होता. त्याने स्पीड खूप वाढवली आणि त्याच स्पीडने ती साडी तरंगत पुढे येत होती. पूल संपल्यावर फ्लॅटवर येईपर्यन्त ते दोघे एकेमेकांना काही बोलले नाहीत.
दार उघडून आत आल्यावर माधव म्हणाला, “हे स्वप्न तर नाही ना ?”
“आज झोप लागली तर पडेल कदाचित “, लाईटच बटन दाबत दिनेश म्हणाला.
“ह्या लाईटला पण आजच जायचं होतं वाटतं. तुझ्याकडे मेणबत्ती सोडून काही आहे का कंदील, चिमणी वगैरे “, मेणबत्तीवर विशेषभर देत माधव म्हणाला.
“नाही तसलं काही नाही. तुझ्या मोबाईलचं टॉर्च लाव. मोबाईल बंद होईपर्यंत चालू राहू दे. आपण इथेच हॉलमध्ये झोपू “.
दिनेश आणि माधव गादीवर त्याच कपड्यात आडवे झाले. थोड्या वेळाने टेबलवर असलेल पेपर उडून खाली फ्लोरवर पडलं आणि सरकत एका बाजूला झोपलेल्या दिनेशच्या चेहर्यावर येऊन थांबला. दिनेशला ते लागताच तो उठून ते पेपर हातात घेतला. “मधुमती सोसायटीजवळच्या पूलाजवळ अपघात, तरुण मुलगी आणि एका व्रद्धाचा कारमध्ये मृत्यु” ही बातमी त्याला दिसली. तो खाली वाचन्यासाठी पाहू लागला, तेव्हा त्याला मला पसंद आहे हे पहिलं वाक्य दिसलं. तेच वाक्य बातमीच्या खाली परत परत होत. त्याच्या कापर्या हातातून पेपर खाली पडलं. तो पेपर परत उचलून डोळे मिचकून पेपरचे इतर पाने चाळू लागला. त्याला प्रत्येक पानावर “मला पसंद आहे म्हणा” हेच दिसत होतं. त्याने पेपर चुरगाळून डस्टबीनच्या डब्याकडे फेकून दिला आणि उशीखाली डोके घालून झोपू लागला. पण स्विच-ऑफ झालेला त्याचा फोन व्हायब्रेट होऊ लागला. स्क्रीनवर नंबर होता. त्याने फोन उचलला आणि तिकडून आवाज आला, “मी सुनैना. लोनसाठी…”,
“मला पसंद आहे..मला पसंद आहे “, अस म्हणत त्याने उठून गादीवर फोन आपटला. बाजूला झोपलेल्या माधवने पांघरून घेतलेली अंगावरील लाल कलरची चादर साडी प्रमाणे नेसून उठून बसला होता. घोगर्या आवाजात तो म्हणाला, “थॅंक यू, पुढील कार्यक्रम लवकरच होईल “
भारी 🙂👍
Keep it up.
Thrilling!!! 🙏