स्प्लेंडरच्या नंबर प्लेटला सुशील दगडाने मारत होता. “अजून किती वेळ लागेल?”, बॅटरी प्लेटवरुन फिरवून सुशीलच्या चेहऱ्यावर मारत रोहन म्हणाला. “तू माझ्या डोळ्यावर मारायच बंद केलास तर होईल लवकर ”
रोहन बॅटरी प्लेटवर ठेवून वाकून पाहू लागला. “हे काय तू प्लेट वर काय मारत बसलास ”
“म्हणजे ”
“प्लेट असलेल्या मरगाडला मार. पूर्ण तोडून टाक ”
रोहन म्हटल्याप्रमाणे सुशीलने तिरका होउन प्लेटच्या मागून जोरात मारला सुरुवात केली आणि तीन-चार फटक्यात प्लेट मरगाडसोबत खाली पडली. सुशीलने जमिनीवर पडलेलं प्लेट हातात घेतलं आणि उठला.
“ही बाईक अशीही चोरीची आहे. प्लेट असो-नसो काय फरक पडतंय ”
“सिग्नलवरच्या सीसीटीव्हीवर प्लेट दिसला तर उगाच प्रॉब्लेम नको “, एकदा प्लेटवर आणि एकदा सुशीलच्या चेहऱ्यावर बॅटरी मारत रोहन म्हणाला.
“हे थोडीच पुणे-मुंबई आहे ”
“पण आपण जिथे चाललो तिथे तर असू शकतात कॅमेरे “, सुशीलच्या चेहर्यावर परत बॅटरी लावत रोहन म्हणाला.
“बरं मग काय करणार ह्या प्लेटचं “, डोळ्यांसमोर हात ठेवून डोळे मिचकवत सुशील म्हणाला.
“हे अशा ठिकाणी असलं पाहिजे जिथं कोणाला सहज सापडणार नाही “, रोहन बॅटरी चारी बाजूने फिरवत होता.
“म्हणजे कुठे?”
“म्हणजे तिथे “, त्याने बॅटरीचा प्रकाश एका ठिकाणी स्थिरावला होता. “ह्या बॅटरीला तिथेच पॉइंट कर ” रोहनने बॅटरी सुशीलला दिली. सुशील मान झुकवत तिथे काय आहे बघण्याचा प्रयत्न करत होता. रोहनने अर्ध लटकत असलेलं मरगाड तोडून खाली फेकलं आणि प्लेटला प्रकाशाच्या दिशेने भिरकवलं.
“ही तर विहीर दिसतेय “, सुशील त्या भिरकत हवेतून जाणार्या प्लेटकडे पाहत म्हणाला.
“पडली का आत “,
“हो वाटत तर आहे “, सुशीलने बॅटरी बंद करून पाठीवर असलेल्या बॅगेत ठेवली. बाईकला रस्त्याच्या बाजूला पार्क करून ते शेतात घुसले. तिथे गुडघ्याएवढं गवत आलेलं होत. “चल सावकाश पुढे जाऊया “, सुशीलने कटर आणि हातोडा बाहेर काढला.
थांब वाड्यासमोर अम्बॅसॅडर उभी आहे “, रोहन एक टक कारकडे तर सुशील वाड्याकडे पाहत होता.
थोड्या वेळात एक पन्नाशी ओलांडलेलं जोडपं बाहेर आलं आणि कारमध्ये बसलं. “आपल्याकडे किती वेळ आहे?”, कटर आणि हातोड्याला साफ करत सुशील म्हणाला. “ते अर्ध्या तासात येतील “. जशी कार मेन रस्त्याकडे येऊ लागली तसे हे दोघे वाकून वाड्याकडे येत होते. “हे काय “, सुशीलचा पाय खोलवर आत गेला होता. बाजूला थोडं मागे असलेला रोहन थांबला आणि निरखून पाहू लागला. “ही साळीची शेती आहे “, तो जवळच उजव्या बाजूला पाहू लागला आणि म्हणाला, “तिकडून जाऊया. जमीन एवढी ओली वाटत नाही “.
“पण माझ्या बूटाला घाण लागली आहे ”
“बर झालं, बूटाचे ठसे तर उमटणार नाहीत, चल लवकर “. त्या दिशेने हे दोघे हळू हळू चालू लागले. कार वळून मेन रस्त्यावर येताना ह्यांच्यावर प्रकाश येताच ते दोघे तिथेच शेतात आडवे झाले.
“गेली वाटतं कार ”
“हो आता टाईम नाही “, रोहन म्हणाला आणि उठून वाड्याच्या दिशेने पळू लागला. सुशील जमिनीवर पडलेलं हातोडा आणि कटर घेऊन त्याच्या मागे पळू लागला.
वाड्याच्या दारासमोर उभा राहून सुशील कुलूपाकडे पाहत होता. रोहनने मूठ आवळून दारावर दोन-तीनदा मारून पाहिलं. “दार मजबूत आहे ”
“आणि कुलूप पण “, सुशीलने हातोडा आणि कटर खाली ठेवला आणि बॅग मधून वेगवेगळ्या प्रकारच्या लोखंडी पिनांचा सेट असलेली गोलाकार रिंग बाहेर काढली. कुलूपाला हात लावून एकदा सर्व पिनांनावर बोटे फिरवून त्याने एक पीन निवडली आणि कुलूप काढलं.
आत गेल्यावर त्यांना डावीकडे आणि उजवीकडे तीन रूम दिसल्या. समोरच्या खोलीतून आवाज येत होता. रोहन सावध झाला. सुशील सावकाशपणे तिथे गेला आणि खिडकीतून तिरक्या नजरेने पाहू लागला. “ती बाई गॅसवर कुकर तशीच ठेवून गेली वाटतं “. सुशील आत गेला. “काय करत आहेस ?”, रोहन खिडकीतून म्हणाला. “बंद करतो, कुकर उडाला किंवा खाली वगैरे पडला तर शेजारचे येतील ”
“ह्या वाड्यापासून अर्धा किलोमीटर कोणी राहत नाही ”
सुशील गॅस बंद करून बाहेर आला. ते दोघे डाव्या बाजूच्या प्रत्येक रूममध्ये जाऊन पाहू लागले. धान्याचे पोते आणि काही आंब्याचे बॉक्स हेच त्यांना दिसलं. शेवटी स्वयंपाकघराच्या उजव्या बाजूला असलेल्या रूममध्ये त्यांना गुढघ्याएवढी उंच एक तिजोरी दिसली.
“तुझं काम “, रोहन बाजूला झाला. सुशीलने परत पिनांची रिंग बाहेर काढून तिजोरीला लावून चेक करू लागला. तीन-चार वेगवेगळ्या पिना वापरुन झाल्या पण तिजोरीचं दार काही उघडलं नाही. “काय झालं सुश्या “, रोहन उतावीळ झाला होता. “एक पण पिन लागत नाही. बहुतेक परदेशातली आहे “,
“तुला एक काम होत नाही ”
“हे काम तुझं आहे माहिती काढायचं “, सुशीलने रिंग खाली फेकली आणि हातोडा उचलला.
“हे कशाला ह्याने काय तिजोरी फोडणार आहेस का ”
“बघतो तर “, त्याने होतड्याने एक वार केला आणि त्याच्या हाताला हादरा बसला.
“तुझ्या ह्या हातोड्याने मारून मारून हात तुटेल पण तिजोरीला काही होणार नाही आणि आपलं वेळ पण जाईल ”
“मग काय करायचं तिजोरीलाच उचलून घेऊन जायचं का?”, त्याने रागाने हातोडा खाली फेकला. रोहन तिजोरीकडे पाहू लागला.
“तस होतंय का बघू ”
“काय?”
रोहनने तिजोरीचा डावा तर सुशीलने उजवा कोपरा धरला होता. रोहनच्या हातातून कोपरा निसटला आणि तिजोरी खाली पडली. “माझा पाय “, सुशील पायाला धरत एका पायावर उभा राहत ओरडू लागला.
“ओरडू नकोस, काय झालं ”
“माझ्या पायावर पडली. तुला नीट पकडता येत नव्हतं ”
“अचानक निसटली. वजनाचा अंदाज आला नाही. ह्या तिजोरीला बाईक वरून घेऊन जाऊ. ओझं नको उचलायला “, रोहन बाहेर बाईककडे गेला.
सुशील बूट काढून किती लागलं आहे पाहू लागला. मधेच तो पायाला मालीश करत होता. त्याच लक्ष तिजोरीच्या बाजूला पडलेल्या चावीकडे गेलं. त्याने ती चावी घेतली आणि तिजोरीला पाहू लागला. तिजोरीच दार जमीनाच्या दिशेने होत. बाईक चालू होत नसल्यामुळे रोहन बाईकला किक मारत होता. मागून येणार्या प्रकाशाला पाहून तो बाजूला होऊन अंधारात लघुशंका करत असल्याचा नाटक करू लागला. त्याला अम्बॅसॅडर वाड्याकडे जाताना दिसली. ती पाहून तो बाईकजवळ जाऊन परत जोरात किक मारू लागला.
“तुला म्हटलं होतं की निघताना सर्व दारं, खिडक्या आणि गॅस चेक कर म्हणून ”
“मी विसरले “.
सुशीलने कसबस तिजोरीला फिरवत दार समोरच्या दिशेने केलं आणि चावी लावून पाहिली. क्लिक असा आवाज आला आणि तिजोरीच दार उघडलं. वरच्या कप्यात पाचशे आणि हजारच्या नोटांचे गट्टे होते आणि खालच्या कप्प्यात सोन्याची बिस्किटे आणि दाग-दागिने होते. सुशील हॉर्नचा आवाज ऐकून पुटपुटला, “रोहया आला वाटतं “.त्याने एका मुठीत एक हजारांच्या नोटांचा गट्टा आणि बिस्किटे तर दुसर्या मुठीत येतील एवढे दागिने उचलली. त्याने दागिने बॅगेत असलेल्या एका छोट्या कप्प्यात ठेवल्या. गॅस बंद करण्यासाठी बाई वाड्याच्या आत आली आणि स्वयंपाकघराच्या दिशेने चालू लागली. सुशील दुसऱ्या हातात पायातील बूट घेऊन बाहेर आला.
“हे बघ रोहया..”. सुशीलच्या समोर ती बाई आत जात होती. त्याला पाहून ती थांबली आणि त्याच्या हातातील पैसे आणि बिस्किटांकडे पाहून ती ओरडू लागली, “चोर चोर “. सुशीलने एक गट्टा तिच्याकडे मारला आणि त्याला कळलं कि बूट तर हातातच आहे, मग त्याने ते पण तिच्याकडे फेकून दिलं आणि वाड्याच्या मेन दाराकाडे धावत गेला. त्या बाईने मात्र बरोबर त्याचं बूट हातात घेतलं आणि सुशीलच्या मागे चोर चोर ओरडत धावू लागली. सुशीलला उंबरठा ओलांडल्यावर रोहन दिसला. तेवढ्यात त्या बाईने फेकलेला बूट त्याच्या पाठीवर येऊन आपटला. पण बॅग असल्यामूळे त्याला फक्त मानेलाच थोडा मार बसला.
रोहन बाईकवरुन वाड्याकडे येत होता. सुशीलला आणि तिच्या पाठोपाठ आपल्या बायकोला बाहेर येताना पाहून कारमधल्या व्यक्तिने कार चालू केली. कारची हेडलाईट सुशीलच्या चेहर्यावर पडली आणि त्या दोघांना त्याचा चेहरा आणि त्याच्या हातात असलेला एवज स्पष्ट दिसत होत. रोहनने बाईक तिथेच थांबवली आणि वळवून मागे निघून गेला. सुशील ते पाहून “रोहया..रोहया ” ओरडत बाजूला असलेल्या शेतात घुसला आणि सर्व ताकदीने धावू लागला. धावताना त्याच्या हातातून एक-दोन बिस्किटे शेतातच पडली.
शेत संपल्यावर एक छोटसं जंगल होतं. सुशील धापा टाकत तिथे एका झाडाखाली बसला. त्याच्या हातात फक्त दोन बिस्किटे राहिली होती. मेन रोडवरून एक ऍम्ब्युलन्स आवाज करत गेली. ते ऐकून पोलिसाची गाडीच आली ह्या भीतीने तो आजूबाजूला पाहू लागला. झाडाच्या बुडाजवळ जमिनीवर पडलेला पालापाचोळा दूर करून त्याने बॅगेतल्या हातोड्याने माती उकरू लागला. एक फूटचा गड्डा झाल्यावर त्याने बॅग आणि हातोडा आत गड्यात ठेवली आणि माती पसरवून त्यावर पालापाचोळा चढवला. हातात ती दोन बिस्किटे पकडून तो जंगलातून वाट काढत बाहेर आला.
त्याच्या पायाला पाणी येऊन धडकलं. थोडसं पाणी त्याच्या एका पायात असलेल्या बुटातून जाणवू लागलं. समुद्राला भरती आली होती. समोर एक रिकामी होडी उभी होती. समुद्राच्या लाटेच्या आवाजाशिवाय दुसरं काही ऐकू येत नव्हतं. सुशील आजूबाजूला पाहत होडीजवळ आला. त्या होडीला एका दाव्याने लोखंडी खांबाला बांधलं होतं. ती गाठ सोडून सुशील होडीला समुद्रात ढकलून आत बसला. “दोन-तीन किलोमीटर पार करायचंय आपल्याला “, हातातील बिस्किटांकडे बघत सुशील म्हणाला.
थोडं अंतर पार केल्यावर त्याला रोहन बाईक पार्क करून उभा असलेला दिसला. तो त्याला हातवारे करत होता. त्याला पाहून सुशील होडी आणखी आत नेऊ लागला आणि जोराने पुढे जाऊ लागला. रोहन धावत त्याच्याकडे गेला. त्याने बाईकच स्टँड नीट लावलं नव्हतं. समुद्राच्या पाण्याने स्टँड खालची माती घसरत होती.
छातीच्या वर पाणी गेल्यावर रोहनने आत डुबकी मारून पोहायला सुरुवात केली. तो होडी जवळ आल्यावर सुशील त्याला होडीतील असलेल्या लाकडी पॅडलने होडीपासून दूर करण्याचा प्रयत्न करू लागला. पण वारं आणि समुद्राच्या लाटांमुळे होडी हेलकावे खत होती. त्याला चुकवत रोहन होडीमध्ये आला. “मला दगा देऊन माल पळून नेण्याचा विचार करत होतास “, रोहन त्याच्या हातातील बिस्किटांकडे बघत ओरडला. “तुला पण मी पाहिलं बाईकवरुन पळून जाताना “, होडीला घट्ट पकडत सुशील म्हणाला. रोहन त्याच्यावर धावून आला. त्या दोघांत हातापाई सुरू झाली.
वार्याचा वेग आणखी वाढला होता. पॅडलने मारताना सुशीलचा तोल जाऊन होडीच्या खालच्या एका कुजलेल्या भागाला लागला आणि त्यात पाणी शिरायला सुरुवात झालं. हे त्यांच्या तेव्हा लक्षात आलं, जेव्हा होडी हळूहळू समुद्राच्या पातळीशी येऊ लागली. ते पाहून सुशील घाबरला. त्याचं लक्ष नसलेलं पाहून रोहनने त्याच्या हातातील बिस्किटे काढून घेतली.
“रोहया ती बिस्किटे घे पण मला सोडून जाऊ नकोस. मला पोहता येत नाही “, तो हात जोडून त्याच्यासमोर उभा होता. “बरं झालं मी मारण्यापेक्षा समुद्रचं तुला मारलेलं “, जोरात हसत रोहनने होडीतून उडी मारली आणि किनार्याकडे पोहत जाऊ लागला. “वाचवा वाचवा “, असं ओरडत सुशील एका टोकाकडे जाऊन हातात येईल तेवढं पाणी घेऊन बाहेर फेकत होता. त्याचा आवाज बंद झाल्यावर त्याने एकदा वळून पाहिलं आणि किनार्यावर पोहचला.
“हे घ्या “, हजाराच्या नोटांचा गठ्ठा उचलून देत बाई म्हणाली. “बिस्किटं चेक कर “, स्वयंपाकघराच्या डावीकडील रूममध्ये जाऊन बाईने गव्हाच्या पोत्यातील बिस्कीट तपासली आणि म्हणाली, “खरे बिस्किटं इथं आहेत ”
रोहनला सुशील पाण्यावर तरंगताना दिसत होता. हसत तो अंगावरचं पाणी झटकू लागला. तस करताना त्याच्या हातातील बिस्किटे खाली पडली. खाली बसून तो बिस्किटांवरील माती पुसू लागला. तेवढ्यात लाट ओसरून बाहेर आलेल्या मगरीने जबडा उघडला आणि त्याच्या बिस्किटाचा हात तिच्या जबड्यात घेतला. रोहनने ओरडण्याच्या आत मगरीने खेचत त्याला समुद्रात नेलं. दुसऱ्या लाटेनंतर किनाऱ्यावर नंबर प्लेट नसलेली स्प्लेंडर फक्त आडवी पडलेली होती.