अर्ध्या तासात ऑपरेशनला सुरुवात होणार होती. डॉ. संतोष साने आपल्या टीमसोबत ऑपरेशनच्या तयारीबद्दल बोलत होते. “सर्व तयारी झाली आहे का ?” डॉ. साने म्हणाले.
“हो सर ” डॉ. शेरणे म्हणाला.
“पेशंटसोबत त्यांच्या कुटुंबापैकी कोण आल आहे ” साने हातातील फाईल बघत म्हणाले.
“कोण-कोण आल आहे विचारा ” डॉ. सुभदा म्हणाली.
“म्हणजे ?” फाइल खाली ठेवत साने म्हणाले.
“त्यांचं पूर्ण कुटुंब आल आहे. नातवंडांसहित. तुम्हाला तर माहीतच आहे त्यांच पोलिटिकल प्रभाव आणि आपल्या हॉस्पिटलच्या डायरेक्टरसोबतचे मैत्री संबंध”, डॉ. सुभदा म्हणाली.
“आय सी ” साने चश्मा काढून टेबलवर ठेवत म्हणाले.
“रविंद्र, तुझा हा पहिला ऑपरेशन आहे ?”
“हो सर “
साने खुर्चीवरून उठून त्यांच ड्रेस घालत म्हणाले, “लेट्स गो “.
ऑफिसच्या बाहेर ठाकूर यांचा मोठा मुलगा राकेश फोनवर बोलत होता. “मला काही माहीत नाही, ते झालं नाही तर त्याला असा अडकवीन की तो स्वत:लाच विसरून जाईल. त्या नीलेश सारंगला माहीत नाही तो कोणाच्या वाटेला आला आहे “. सानेंना बघताच त्याने फोन ठेवला. सानेंनी सर्व काही ऐकल होत. “नमस्कार डॉक्टर “
“नमस्कार “
“ऑपरेशनला किती वेळ लागेल आणि ते शुद्धीवर कधी येतील ?”
“ऑपरेशनला साधारण दोन तास लागतील. पण त्यांना आराम कराव लागेल, एक-दोन दिवस तरी “
“हो सर्व सुरळीत आणि आरामात व्हावे म्हणून तर खास तुमच्याकडे आलो आहे. तुम्ही असे ऑपरेशन करण्यासाठी सिटिमध्ये बेस्ट आहात”
“मी येतो. मला उशीर होतोय ” साने हातातील घड्याळाकडे बघत म्हणाले. जातेवेळेस ठाकुरची बायको ललिताने सानेंना दोन्ही हात जोडून नमस्कार केली. सानेंनीदेखील थांबून न बोलता नमस्कार करत पहिल्या मजल्यावरील ऑपरेशन थिएटरमध्ये गेले.
ऑपरेशन थिएटरमध्ये त्यांची सर्व टीम ग्रीन ड्रेसमध्ये उभी होती. रविंद्रच्या हाताला घाम फुटल्यामुळे त्याला ग्लोव्हस घालताना वेळ लागत होता. दोन तासानंतर सिद्धार्थ आणि त्याचा भाऊ राकेश दोघे बाहेर उभे होते. सिद्धार्थ हाताची घडी घालून उभा होता. राकेश एकदा घड्याळाकडे, तर एकदा ऑपरेशन थिएटरच्या दारावर असलेल्या लाईट बल्बकडे बघत होता. एक तासांनी रेड लाईट नाहीशी झाली. साने बाहेर आले. “काय झालं डॉक्टर ?” राकेशने विचारलं.
“ऑपरेशन झालेल आहे. त्यांना दोन दिवस विश्रांतीची गरज आहे”.
“खूप वेळ लागला डॉक्टर. “
“पेशंटनुसार वेळ मागे-पुढे होतो. ” साने म्हणाले आणि आपल्या केबिनकडे गेले. त्यांच्या पाठोपाठ दोन सर्जन सोडून बाकीचे त्यांच्यामागे गेले. खाली आल्यावर सानेंना बघताच लालिता उठून त्यांच्याकडे पाहत म्हणाली, “कस झाल ऑपरेशन डॉक्टरसाहेब “
“ऑपरेशन यशस्वी झालेल आहे. पण तुम्हाला त्यांना भेटता येणार नाही अजून दोन दिवस तरी ” साने म्हणाले आणि केबिनमध्ये गेले.
“ही कॉम्प्लिकेशन यायला नको होती “
“पण ऑपरेशन तर यशस्वी झाला सर ” डॉ. शेरणे म्हणाला.
“प्रश्न त्याचा नाही. ही गोष्ट अपेक्षित नव्हती. मी त्यांची केस पाहली होती. आता मला एक काम आहे. मी निघतो. ठाकूरना स्पेशल केर वार्डमध्ये शिफ्ट केल्यानंतर खास नियमित लक्ष ठेवा “
दोन दिवसानंतर ठाकूरना स्पेशल केरमधून ट्रान्सफर केल. “सर, ठाकुर यांची स्थिती आता नॉर्मल होत आहे. ” डॉ. सुभदा म्हणाली.
“गुड ” साने पेपर हात घेत म्हणाले. सानेंची नजर पेपरमधील डाव्या बाजूला असलेल्या बातमीकडे गेली. “नीलेश सारंग यांच्या फर्म वर राज्य महसूल खात्याची रेड, ठाकुर ग्रुपचे फर्ममधील स्टेक घेण्याचे प्रयत्न यशस्वी “. ती बातमी पेपरच्या मध्यभागी असल्यामुळे सानेंनी पेपर फ्लिप केला. साने ती बातमी वाचत होते आणि सुभदा तिथेच उभी असलेली त्यांच्या लक्षात नाही आल. “सर..सर “
“सॉरी सुभदा, तू तुझ्या राऊंडसाठी जाऊ शकतेस, थॅंक्स “
“ओके ” सुभदा टेबलवर ठेवलेलं स्टेथोस्कोप गळ्यात अडवकत निघून गेली.
ती बातमी वाचून झाल्यावर साने डेस्कवर दोन्ही हात ठेवून तिथे असलेल्या आपल्या बायको आणि मुलासोबतच्या फोटोकडे बघत होते. त्याच्या कोन्वोकेशनवेळेस अमेरिकेत काढलेला तो फोटो होता . फोटोच्या बाजूला ठेवलेल्या मोबाईलवर सुमनचा फोन आला होता. सानेंनी तो लगेच उचलला, “सुमन, तुमचीच आठवण काढत होतो. “
“काय झालं “
“काही नाही, तुम्हा दोघांची आठवण येत होती ” साने पेपरकडे बघत म्हणाले.
“तीन दिवसांनी तुमची फ्लाइट आहे. तुम्ही येणार आहातच “
“हो “
“मी तर म्हणते इथेच सेटल व्हायच. कुणालपण हेच म्हणत आहे. तुम्ही इथेच या म्हणून “
“मी आल्यावर बोलू त्याबद्दल ” सानेंनी फोन ठेवला आणि सुभदाला फोन लावला. दोन वेळेस प्रयत्न करूनदेखील तिचा फोन कवरेजच्या बाहेर आहे असाच ऐकू येत होतो. सानेंनी फोन, वॉलेट आणि कारच्या चाव्या घेतल्या आणि केबिनच्या बाहेर निघाले. तितक्यात सुभादाचा फोन आला. “सुभदा तुझा फोन आजपण लागला नाही “
“सॉरी सर, पण काय करणार इथे लोवर ग्राऊंडला माझ्या फोनला रेंज येत नाही “
“ओके, मी आता राऊंडला चाललो आहे आणि उद्या मी हॉस्पिटलला येणार नाही. काही अर्जंट असेल तर मला कॉल कर किंवा डॉ. उपाध्येना भेट “
“ओके सर “
दुसर्या दिवशी साने सकाळी दहा वाजता असलेल्या मेडिकल कॉन्फ्रेंससाठी गेले. कॉन्फ्रेंस झाल्यावर तिथेच जवळ असलेल्या मॉलमध्ये प्रवासासाठी खरेदी केली. दोन वाजता हातात बॅग घेऊन घरी आल्यावर ते दोन्ही बॅग स्वत:च्या बाजूला ठेवून मध्यभागी सोफ्यावर बसले. त्यांचे डोळे झाकत होते. त्या बॅग्ज खाली ठेवून ते तिथेच झोपी गेले. चार वाजता व्यायामाचा रीमाइंडर वाजल्यावर त्यांना जाग आली. फ्रेश झाल्यानंतर रनिंगसाठीचे कपडे घालून ते सोसायटीला लागून असलेल्या स्पोर्ट्स अकॅडमीच्या मैदानात गेले. तीन किलोमीटर पूर्ण केल्यानंतर साने परत घराकडे निघाले.
गेटजवळ आल्यावर त्यांना वॉचमनने थांबवलं आणि म्हणाला, “डॉक्टरसाहेब, तुमच डॉक्युमेंट आल आहे “. सानेंनी चेहरा आणि हातावरील घाम पुसत तो लिफाफा घेतला. त्यावर S.Santosh, Shraddha Apartments, Pune-01 असा पत्ता होता. त्यामध्ये फक्त दोन ओळीच इंग्लिशमध्ये लिहल्या होत्या.
“The operation you conducted failed. The tools used in that were faulty. There will be an investigation team coming and you have to appear before them. “
सानेंना परत घाम सुटला. पण हा घाम रनिंगचा नव्हता. त्यांना सिद्धार्थ ठाकुर आणि पेपरला वाचलेली बातमी आठवली. रुमालने डोक पुसत त्यांनी तो डॉक्युमेंट लिफाफ्यामध्ये घातला आणि आत गेले. वॉचमन त्यांना सलाम करत असल्याकडे त्यांच लक्ष नव्हतं. घरात जाई पर्यन्त त्यांच्या डोक्यात हाच प्रश्न होता की ऑपरेशन फेल कसं शक्य आहे. पण मी रविंद्रला त्यादिवशी तिथ बोलावलं होत. तो माझ्याच सुपरविझनमध्ये होता. त्यांनी सुभदाला फोन लावला. पण तिचा फोन कवरेजच्या बाहेर असल्याचा आवाज येताच त्यांनी तो कट केला. त्यांचं लक्ष सोफ्याजवळ ठेवलेल्या त्या बॅगकडे गेल. त्यांनी रूममधून प्रवासाची सूटकेस आणली आणि त्यामध्ये बॅग्ज टाकल्या. सोफ्यावर दहा मिनिटे लॅपटॉपवर बसल्यावर त्यांनी फक्त पॅंट बदलली. सूटकेस उचलून घराला लॉक लावून ते खाली उभ्या असलेल्या कॅबमध्ये बसले. कॅब बाहेर जाताना वॉचमनने त्यांना पाहताच सलाम केला. सानेंनी नजर चुकवत मान खाली केली.
पूर्ण प्रवासादरम्यान त्यांचं डोक्यात दोन विचार घुमत होते. ते फेल होण कस शक्य आहे आणि ती पेपरची बातमी आणि राकेशला फोनवर बोलताना ऐकलेल. ड्रायवर कॅब थांबवून म्हणाला, “सर एयरपोर्ट आल आहे. मला इथपर्यन्तच येता येईल “
साने सुटकेस घेत एयरपोर्टकडे गेले. चेक-इन करताना गार्डने त्यांना थांबवलं आणि म्हणाला, “सर तुमची फ्लाइट रात्री बारा वाजताची आहे. तुम्हाला आणखी एक तास बाहेरच थांबव लागेल. सानेंनी त्यांच्या हातातील घड्याळाकडे बघितलं आणि बाहेर असलेल्या बेंचवर जाऊन बसले. थोड्या वेळांनी त्यांनी सुमनला फोन लावला. “सुमन, मी येत आहे ” साने दोन्ही पायावर हाताचे कोपरे ठेवून खाली मान घालून बोलत होते.
“येत आहे म्हणजे, मला कळलं नाही “
“मी आज निघणार आहे. “
“पण तुमची फ्लाईटतर उद्या आहे “
“मी ती कॅन्सल केली. मी सिंगापोरहून येणार आहे “
“पण का, काय झाल अचानक “
सानेच्या डोळ्यासमोर एका फॉर्च्यूनरच्या हेडलाईटचा प्रकाश पडला. सानेंनी डोळे बंद करून परत उघडले तर त्यांना सिद्धार्थ बाहेर येताना दिसला.
“सुमन मी सांगतो नंतर ” अस म्हणत त्यांनी फोन ठेवला आणि दुसरीकडे चेहरा करत चालू लागले. जवळ असलेल्या पांढर्या कलरच्या भिंतीच्या खांबामागे पाहून सिद्धार्थला पाहू लागले. दुसर्या एका फ्लाईटच्या चेक-इनची वेळ झाली होती त्यामुळे प्रवाशांची गर्दी झाली. सिद्धार्थ त्यांना दिसत नसल्यामुळे ते तिथेच उभे होते. त्यांनी हातातील सूटकेस खाली ठेवली. “हा मला शोधायला तर आला नसेल ना ?” सानेच्या डोक्यात हा विचार घुमू लागला.
गर्दी कमी झाल्यावर साने परत एंट्रेन्सकडे पाहू लागले. त्यांना कोणी दिसलं नाही पण फॉर्च्यूनर अजून उभी होती. “डॉक्टर साने “, सानेंच्या खांद्यावर मागे हात ठेवून एक व्यक्ति म्हणाली. सानेंनी एक घटका घेत मागे वळून पाहिलं. साने डोळ्यांची पापणीदेखील न हलवता त्या व्यक्तिला बघत होते. त्यांच्यासमोर ठाकुर उभे होते. ठाकूरच्या बाजूला सिद्धार्थ होता. ठाकुरने हातातील प्लॅस्टिकचा डब्बा सानेंना देत म्हणाले, “हे घ्या डॉक्टर “.
“हे काय आहे “.
“घ्या डॉक्टर खूप गोड नाही “, ठाकुरने डब्बा आणखी पुढे केला.
“हे तिरुपतीहून आणलेला प्रसाद आहे. मी आज पहाटे गेलो होतो. दुपारी दर्शनकरून नऊच्या फ्लाईटने परत आलो. पहिला प्रसाद तुम्हालाच देणार होता सिद्धार्थ “
सानेनी सिद्धार्थच्या होकारार्थी हसण्याकडे बघितलं. “पण तुम्ही इथे कसे “, ठाकुर म्हणाले.
“मी..इथे…म्हणजे..माझा एक मित्र येणार होता त्याला घ्यायला आलो आहे “
“सूटकेस घेऊन ” ठाकुर सुटकेसकडे बघत म्हणाले.
सानेंनी सुटकेस हातात घेतली. “ही त्याचीच आहे. तो वॉशरूमला गेला आहे “
“डॅडी राकेशभैय्याचा फोन येतोय ” सिद्धार्थ म्हणाला.
“चला डॉक्टरसाहेब येतो आम्ही. धन्यवाद. तुमच्यामुळे मी पूर्वीसारखा बरा झालो “
“थॅंक यू डॉक्टर “, सिद्धार्थ म्हणाला. सानेंनी गोंधळात औपचारिकता म्हणून थॅंक्स म्हटलं.
ठाकूर गेल्यावर त्यांनी लगेच टॅक्सी करत घरी आले. साडे अकरा वाजेले होते. वॉचमन टोपी डोळ्यावर सरकावून एका खुर्चीवर पाय ठेवून झोपी गेला होता. साने त्याच्याकडे बघत सोसायटीच्या पोस्ट बॉक्स कडे गेले. तिथे त्यांना एस. संतोष नावाचा एक बॉक्स दिसला. त्यामध्ये एक लिफाफा अर्धवट बाहेर आलेला होता. त्यांनी तो उघडून हातात घेतला आणि पहिले दोन वाक्य वाचल्यावर त्यांनी हातातील लिफाफा मुठीत घट्ट पकडला. ती वाक्य होती. To, Srinivas Santosh, Jr. Quality Engineer, Gopal Textiles Pvt Ltd.
सानेंनी त्यांच्याकडे असलेला फक्त S.Santosh नावाचा आणि हा डॉक्युमेंट त्या चुरगळलेल्या लिफाफ्यामध्ये घातला.