निकाल लागून आणि पुण्यात येऊन १ आठवडा झाला होता. मी लॅपटॉपवर मूव्ही बघत बसलो होतो. कालच अप्लाय केलेल्या जॉब सर्च साईटवरुन मेल आला की उद्या इंटरव्ह्युसाठी या म्हणून. लगेचच कपाटात फॉर्मल ड्रेस आहेत की बघायला लागलो. पाच सहा टीशर्ट आणि पॅन्ट दिसले. दारामागे चेक केलो तर तिथे काल मॉलला घालून गेलेला तपकिरी रंगाचा शर्ट आणि पांढरी पॅंट दिसली. तोच पुन्हा कडक इस्त्री केला. तसाही कॉलेजमध्ये काय इंटरव्ह्यु दिलेला अनुभव नव्हता, पण तरी वाटलं की इंटरव्ह्युला चाललो की ऑडिशन द्यायला. सकाळी घाई नको म्हणून पेन आणि फाईल यांची तयारी केली. १० वाजले होते आणि आता काय कॅफे उघडे नसणार. आणि असला तरी अर्जंट म्हणून जास्त पैसे घेतला असता. मग उद्या जाताना जवळच्या कॅफे मधून प्रिंट काढावी म्हणून पेन ड्राइव शोधू लागलो. नंतर लक्षात आले की त्यावरच तर मूवी बघत बसलो होतो. मग चालू असलेला मूवी बंद करून डेस्कटोपवरील रिजूम कॉपी केला.
झोपते वेळेस सर्व तयारी झाली आहे की याची खात्री केली. पण विचार आला की सर्व झालं पण अभ्यासच केला नाही !
सकाळी उठून चहा नाश्ता केला. पहिला इंटरव्ह्यु असल्यामुळे देवाचे आशीर्वाद घ्यावं म्हणून फोटो शोधू लागलो. पण साधा महालक्ष्मी कॅलेंडर पण नव्हता रूममध्ये. शेवटी मोबाइलवर गूगलवरुन देवाचे फोटो सर्च केला आणि नमस्कार केलो.
निघण्यासाठी बाईककडे वळलो. पण विचार केला की जर कॅब किवा ऑटो करून गेलो तर थोड फार वाचन तर होईल.ऑटोचा आवाजपण इतका मोठा होता की व्यवस्थित लक्ष देखील लागत नव्हतं. १ किलोमीटर अंतर होईपर्यंत कसं तरी वाचता आल. नंतर इतके खड्डे सुरू झाले की वाचताना कुठली लाइन पुढची असेल ह्यासाठी परत एकदा तीच लाइन वाचायला लागायची. जेव्हा खड्ड्यामुळे हातातून दोनदा नोट्स खाली पडल्या, तेव्हा बॅग मधून हेड्फोन घालून गाणे ऐकत बसलो.
गेटवरील सेक्युरिटीने नाव आणि ओळखपत्र बघून एक टेम्पररी पास दिला. तो मी घालून इतर कॅन्डीडेट सोबत आत गेलो. जवळजवळ १० मुले आणि ५ मुली अगोदरच बसले होते. रिसेप्शनवाली मॅडम फोनवर बोलत होती सर्व शॉर्ट लिस्ट केलले कॅडीडेट आले आहेत. मी माझा रेजुम रेकेप्शनकडे दिला. आणि पाहतो तर काय माझ्याबरोबर आलेले सर्वजण संगीतखुर्ची खेळत असल्यासारखे जागेवर जाऊन बसले. मला मात्र उभ राहावं लागलं.
थोडया वेळाने एक तरुण मुलगी हातात रेजूमेझ घेऊन प्रत्येकाचे नाव घेऊ लागली. बहुधा HR असावी.
“सचिन जोशी”
मी उभा असल्यामुळे फक्त हात वर केला. तिने आम्हाला आत नेल आणि एकेका इंटरव्ह्यु पॅनलकडे पाठवल.
माझा इंटरव्ह्यु चांगला गेला. त्या पॅनलने बाहेर वेट करायला सांगितलं. मला पण थोड रीलॅक्स वाटल. वाशरूम मधून बाहेर येताना मला कंपनीचा लोगो दिसला. कोणी आजूबाजूला तर नाही याची खात्री केली, टेम्पररी पासला पलटवल आणि एक सेल्फी काढली.
मी बाहेर येऊन परत उभा राहिलो. थोडया वेळाने एक मागच्या रांगेतला मुलगा कानाला फोन लावत उठला आणि माझ्या बाजूला येत म्हणाला, अरे सुमित, सचिन बोलतोय आणि मीटिंग रूममध्ये गेला.
मी त्या जागेत स्थानापन्न झालो. प्रत्येकजण खाली मान घालून आपल्या मोबाईलवरच होते. कोणी फेसबूक तर कोणी व्हाट्सअप बघत होत. मी दुसर्या राऊंडला काय विचारतील हे सर्च करत होतो.
१० मिनिटांनी HR नी हातात एक लिस्ट घेऊन आली आणि अन्नोउन्स केल की
“दीज कॅन्डीडेट कॅन लीव फॉर द डे”
मी मात्र माझ नाव नसेल म्हणून निवांत होतो.
“सचिन जोशी”
जस हरिण काही तरी विलक्षण ऐकल्यावर कान उभे करतो तस माझ्या कानाची स्थिती झाली. कासवासारखा हळू हळू मी चालायला लागलो.रिसेप्शनला पास देऊन बाहेर आलो.
कंपनीच्या गेटसमोर चहाच्या टपर्या होत्या. केलेला इन् शर्ट काढला आणि हाताच्या भाह्या मागे घेत चहा पिऊ लागलो. एक बर झालं की बस स्टॉप जवळच होता. दहा मिनिटात बस पण आली. दुपारची वेळ असल्यामुळे विंडो सीट भेटली. मोबाईलवर गाणे एकावे म्हटलं तर बॅटरी लो चा नोटिफिकशन आला. सकाळपासून जीपीएस आणि नेट ऑन होत. दहा मिनिटांनी एक कॉल आला. एका स्त्रीचा आवाज होता आणि परिचयाचा वाटला.
“इज धीस सचिन”
“हो, आय मीन येस”
मग ती पण मराठीतच बोलायला लागली.
“तुझा दूसरा राऊंड आहे इंटरव्ह्युचा. तू फ्लोरवर दिसत नाहीस म्हणून कॉल केला. रेजुम वरील ७२.. वाला नंबर तुझाच आहे ना”.
मला काही सेकंद कळेनाच की काय चालू आहे. हिनेच तर मला लीव फॉर द डे बोलली आणि परत दुसर्या राऊंडसाठी कॉल करतेय.. मग माझ्या डोक्यात ट्यूबलाइट पेटली. मी ज्या जागेत बसलो होतो, त्या मुलाला मी सचिन बोलतोय अस सांगताना ऐकल होत आणि जेव्हा ही नॉट सेलेक्टेडची नावे घेत होती तेव्हा हा मीटिंग रूममध्ये बोलत होता.
“आर यू देअर”
आता हिला काय उत्तर द्यावे सुचेनाच.
“येस”. इतकं म्हणेपर्यंत तर फोन स्विच ऑफ झाला.
शेक्सपिअरने म्हटल्याप्रमाणे “नावात काय आहे” हे कळलं. ह्या पुढे आधार कार्ड घेऊन पूर्ण खात्री केल्याशिवाय बाहेर यायचं नाही आणि पॉवर बँकशिवाय जायचं नाही अस ठरवलं.